दिवाळीपूर्वी थकबाकी द्या
By Admin | Published: October 10, 2016 12:38 AM2016-10-10T00:38:36+5:302016-10-10T01:03:16+5:30
शेवगाव : एस. टी. कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करावे. ३१ मार्च २०१६ च्या वेतनावर २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी
शेवगाव : एस. टी. कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करावे. ३१ मार्च २०१६ च्या वेतनावर २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व एस. टी. कामगारांचे वेतन यांमधील तफावत दूर करण्यात यावी. ६ टक्के वाढीव महागाईभत्त्याची ७५ टक्के थकबाकी एक रकमी दिवाळीपूर्वी मिळावी. सर्वच एस. टी. कामगारांना १५ हजार रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून मिळावी. राज्यातील एस. टी. कामगारांच्या एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटनेस मिळणारी आकसपूर्वक व पक्षपाती वागणूक न थांबल्यास, तसेच कामगारांच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक समयबद्ध काळात व्हावी, आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी येत्या शुक्रवार रोजी राज्यभर विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी जाहीर केला.
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचा अहमदनगर विभागाचा विभागीय कामगार मेळावा शेवगाव येथे रविवारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, प्रादेशिक सचिव विजय पवार, नाशिक विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, सचिव प्रमोद भालेकर, ज्ञानदेव अकोलकर, कार्याध्यक्ष रजनी साळवे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी ताटे बोलत होते.
१ एप्रिल २०१६ पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीच्या मागण्यांचा मसुदा संघटनेने एस. टी. प्रशासनाकडे सादर केला आहे. एस. टी. कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करावा, जेणेकरून नवीन कामगारांनाही भरीव आर्थिक लाभ मिळतील. कंत्राटीकरण पद्धत रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस ५०० रुपये भरून वर्षभर मोफत पास मिळावा. कामगार कराराचा १६ महिन्यांचा काही कर्मचाऱ्यांचा राहिलेला फरक ताबडतोब मिळावा. कर्मचाऱ्यांना आजारी बिल मिळण्यासाठी होणारी दिरंगाई दूर व्हावी. शेवगाव आगारातील कामगार वसाहतीचा प्रस्ताव लगेच मंजूर व्हावा. आदी महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. शेवगाव आगाराचे अध्यक्ष संजय धनवडे यांनी स्वागत केले. तर सचिव दिलीप लबडे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. या वेळी भाऊसाहेब लिंगे, लक्ष्मण लव्हाट, बाजीराव कराड, राजू पठाण, राजेंद्र देवढे, पांडुरंग देशमुख, नवनाथ गर्जे, सुदाम उदागे, मधुकर मोहिते, शिवाजी चव्हाण, दीपक ंिशंदे, शेषराव देशमुख, शरद बडे, गणेश तुतारे, गणेश बर्गे, रामराव वाघ, कृष्णा जाधव, आर. जी. पांडव आदींसह विविध आगारांतील संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.