सीआयडी असल्याचे भासवून दागिने लंपास
By Admin | Published: August 10, 2014 11:25 PM2014-08-10T23:25:39+5:302014-08-10T23:29:09+5:30
अहमदनगर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून अज्ञात दोन चोरट्यांनी एका महिलेकडील दागिने त्यांच्याच पिशवित घालून देण्याचा बहाणा करीत लंपास केले.
अहमदनगर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून अज्ञात दोन चोरट्यांनी एका महिलेकडील दागिने त्यांच्याच पिशवित घालून देण्याचा बहाणा करीत लंपास केले. चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. धार्मिक परीक्षा बोर्डासमोर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
रविवारी रक्षाबंधन असल्याने जैन समाजातील महिला धार्मिक परीक्षा बोर्डात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी चंद्रकला कांतीलाल लोढा (रा. कृष्णकुंज बंगला, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयामागे,भवानीनगर) या धार्मिक परीक्षा बोर्डाकडे जात होत्या. यावेळी दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही सीआयडी पोलीस आहोत. चार-पाच दिवसांपासून या भागात चोरटे येत आहेत. तुमच्या अंगावरील दागिने असे ठेवू नका. ते आताच्या आताच काढा आणि पिशवीत ठेवून द्या’. असे सांगताच लोढा यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी काढली आणि पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते दोघे अज्ञातांनी लोढा यांचे दागिने पिशवित ठेवण्याचा बहाणा करीत धूम ठोकली. त्यानंतर दागिने लंपास झाल्याचे लोढा यांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. या प्रकाराने लोढा या धास्तावल्या. त्यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एस. सी. भुजबळ तपास करीत आहेत.