कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:48+5:302021-04-11T04:19:48+5:30
शिवाजी पवार श्रीरामपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळ पिकांना मागणी वाढली आहे. जीवनसत्व आणि प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या गुणधर्मामुळे लिंबू, संत्री ...
शिवाजी पवार
श्रीरामपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळ पिकांना मागणी वाढली आहे. जीवनसत्व आणि प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या गुणधर्मामुळे लिंबू, संत्री आणि मोसंबी या फळांचा दररोजच्या आहारात आता समावेश झाला आहे. त्यामुळे या फळांचे दर भडकले आहेत.
साधारणपणे मोसंबी या फळाची औरंगाबाद, तसेच जालना जिल्ह्यातून बाजारात आवक होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दक्षिण नगर जिल्ह्यातील पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातही मोसंबीचे क्षेत्र वाढले आहे. संत्र्याच्या बागाही आता नगर जिल्ह्यात बहरल्या आहेत. विशेषत: ही नगर तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. श्रीगोंद्याने तर लिंबू उत्पादनाचे राज्यातील आगार म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या तीनही फळांची आवक चांगली आहे. मात्र, सध्या बाजारात मोसंबी व संत्रीचा पुरवठा होत नाही. लिंबू मात्र मुबलक आहे.
कोरोनाच्या रुग्णांना डॉक्टरांकडून सी जीवनसत्वाची औषधे दिली जातात. मात्र, लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिकदृष्ट्या हे घटक समाविष्ट आहेत. उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे या फळांचे ज्यूस आरोग्यदायी ठरते.
----
पंजाबचा किन्नू बाजारात
जानेवारी महिन्याच्या अखेरीस बाजारातून नागपूरच्या संत्र्याचा पुरवठा बंद होतो. त्यानंतर, पंजाब किन्नू या संत्रा फळाचे आगमन होते. मात्र, त्याला नागपुरी संत्र्याला गोडी नाही. मात्र, तरीही गुणधर्मामुळे नागरिकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते.
----
श्रीरामपूर परिसर हा पूर्वी मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता ही ओळख पुसली गेली आहे. कोरोनासारख्या साथ रोगांपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा मोसंबीसारख्या लिंबूवर्गीय फळांची लागवड करावी. कारण हवामान त्यासाठी अनुकूल आहे.
- सचिन मगर, वरिष्ठ संशोधक सहायक, लिंबू मोसंबी संशोधन केंद्र, श्रीरामपूर
------
आहारामध्ये दररोज लिंबूवर्गीय फळे व विशेषतः आवळ्याचा समावेश करायला हवा. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्त्व आहे. कुठल्याही स्वरूपातील आवळ्याचे सेवन केल्यास ताप व पचनाचा त्रास दूर होतो. कोरोनापासून बचाव होऊ शकतो.
डॉ.महेश क्षीरसागर आयुर्वेद चिकित्सक, श्रीरामपूर
------
लिंबाचे दर
जानेवारी-फेब्रुवारी : ३० ते ३५ रु.
मार्च-एप्रिल : ७० ते ८० रु. (किलो)
मोसंबी
जानेवारी-फेब्रुवारी : २० ते ३० रु.
मार्च-एप्रिल : ५० ते ७० रु.
संत्रा : आवक नाही