पाचेगाव, गोणेगाव परिसरात बिबट्याचे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:21+5:302021-06-16T04:29:21+5:30
पाचेगाव : पावसाळा सुरू होताच नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, मंगळवारी ...
पाचेगाव : पावसाळा सुरू होताच नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पाचेगाव आणि गोणेगाव चौफुली येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संकरित कालवड आणि शेळीचा फडशा पाडला.
पाचेगाव येथील अरुण गोपीनाथ पडोळ हे शेतकरी सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये शेतात वस्ती करून राहतात. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या एक वर्ष वयाच्या संकरित कालवडवर हल्ला करून ठार मारले. नंतर या कालवडीला शेजारील उसाच्या शेतात नेऊन फस्त केले. या घटनेत अरुण पडोळ यांचे अंदाजे अठरा हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बिबट्याने हल्ला केल्याची दुसरी घटना गोणेगाव चौफुली येथे घडली. प्रमोद मधुकर गव्हाणे यांच्या सर्व्हे नंबर ३९ मधील शेतात असणाऱ्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर मंगळवारी पहाटे चार वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली असून, गव्हाणे यांचे अंदाजे तेरा हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला. यावेळी वन विभागाचे बी. बी. पाठक, गोपीनाथ पडोळ, अरुण पडोळ, आबासाहेब लोहकरे, अरुण गायकवाड, अशोक पडोळ, गोणेगाव येथील रावसाहेब दिघे, प्रमोद गव्हाणे, संतोष दिघे, सुरेश ससे, ज्ञानेश्वर गव्हाणे आदी हजर होते.