संगमनेरमध्ये पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:54 PM2019-12-23T15:54:08+5:302019-12-23T15:54:49+5:30
आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे.
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे. तेथूनच एक ओढा वाहत असून ओढ्यालगत त्यांच्या मालकीची विहीर आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पाण्याच्या शोधात या परिसरात आला असता विहरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ओढ्यालागत बबन ढेरंगे हे गायी चारत होते. त्यांना विहिरीतून गुरगुल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीतील आतल्या बाजूला कठड्यावर बिबट्या दिसला त्यांनी त्वरित ही माहिती डाळिंबात काम करणाऱ्या गेनुभाऊ नरवडे यांना दिली त्यांनी जमिनीचे मालक इथापे यांना सांगितले. इथापे यांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांनीही येथे नागरिकांची मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतरही बऱ्याच वेळानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात आल्याचे दिसताच पिंजरा क्रेन च्या मदतीने अलगदपणे बाहेर काढण्यात आला. या बिबट्यास सध्या वनविभागाच्या चंदनापुरी येथील नर्सरीत ठेवण्यात आले आहे. हा बिबट्या नऊ महिन्यांचा होता असे सांगण्यात आले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात मानवीवस्तीतील बिबट्यांचा वावर वाढला आहे. अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे व अन्य प्राणी मानवीवस्तीत येत आहेत. या प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ले होत आहेत. पिकांचेही नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल तेथे वनविभागाकडून पिंजरे लावले जात आहेत.