गुंडेगावात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:54+5:302021-09-26T04:22:54+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ धास्तावले असून वनविभागाने ...
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ धास्तावले असून वनविभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.
गुंडेगाव येथे ८५० हेक्टरवर वनक्षेत्र असून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा येथे वावर कायम असतो. वनक्षेत्राच्या लगत सध्या शेतीकामे सुरू झाली आहेत. त्यातच शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतीकामात व्यत्यय येत असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी गुंडेगाव येथील शेतकऱ्यांनी केल आहे.
एकीकडे बिबट्या तर दुसरीकडे रात्री वीजपुरवठा होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. बिबट्याचा वावर असल्याने कामात खोळंबा येऊन शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अलीकडेच धावडेवाडी, चौधरवाडी परिसरात बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. यात पाळीव प्राण्याचा मुत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे.
वनविभागाचे अधिकारी सुनील थिटे, वनपाल अनिल गावडे, वनसंरक्षक मनसिंग इंगळे, उपसरपंच संतोष भापकर, संजय भापकर आदींनी या भागात पाहणी केली.
-----
नगर तालुक्यासाठी केवळ ३ पिंजरे वनविभागाने उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ८५० हेक्टर वनक्षेत्र गुंडेगावच्या चारही बाजूंनी असताना फक्त एक वनरक्षक, एक वन कर्मचारी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे नियंत्रण करताना अडचणी येत आहेत.
-संजय भापकर,
सामाजिक कार्यकर्ते
---
गुंडेगाव परीसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वनविभागाच्या वतीने लवकरच पिंजरा लावण्यात येईल. बिबट्याचे दर्शन झाल्यास त्वरित वनपाल यांच्याशी संपर्क करावा.
-सुनील थिटे,
वनसंरक्षक, नगर तालुका