पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:50 PM2019-06-08T12:50:23+5:302019-06-08T12:50:57+5:30
तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ असलेला साधारणत: एक वर्षे वयाचा नर बिबट्या वनविभागाने पिंज-यात जेरबंद केला.
पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ असलेला साधारणत: एक वर्षे वयाचा नर बिबट्या वनविभागाने पिंज-यात जेरबंद केला.
पाथर्डी तालुक्याच्या दक्षिण बाजूला बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर गर्भगिरी डोंगराच्या पर्वतरांगा आहेत. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील वनहद्दीत असलेले वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधार्थ स्थलांतरण करत आहेत. तालुक्यात गेली एक वर्षापासून गर्भगिरी डोंगररांगांचा समावेश असलेल्या तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले होते. परिसरातील शेतक-यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. परिसरातील शेतक-यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. त्या अनुषंगाने वनविभागाच्या वतीने माणिकदौंडी परिसरात सापळा लावण्यात आला होता. शनिवारी पहाटे या पिंज-यात भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या अडकल्याचे स्थानिक शेतक-यांच्या लक्षात आले. त्यांनी वनविभागाला तात्काळ कळवल्यानंतर सदरील बिबट्याला पाथर्डी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिका-यांकडून तपासण्यात करून बिबट्याला वनविभागाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल शिरीष निर्भवणे यांनी सांगितले.