देवदैठणमध्ये बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:17+5:302021-01-18T04:18:17+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरुणांना संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय-लेकी त्या ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरुणांना संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय-लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. बिबट्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
१६ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दत्तू कौठाळे यांच्या शेतात अरुण दादाभाऊ कौठाळे हे ट्रॅक्टरने मका पेरणी करीत होते. शेजारील वसंत कौठाळे यांच्या शेतात वसंत यांची पत्नी अनिता व लहान मुलगी प्रज्ञा या कडवळ कापून नुकत्याच घरी गेल्या होत्या. काही वेळातच अनिता यांनी कापलेल्या कडवळाच्या पेंढीवर बिबट्या उभा असलेला अरुण कौठाळे यांनी पाहिला. थोड्या वेळाच्या अंतराने या माय-लेकीवरील संकट टळले होते. बिबट्या दिसल्यानंतर लगेच अरुण कौठाळे, संजय कौठाळे, प्रकाश कौठाळे, रवींद्र कौठाळे यांनी ट्रॅक्टर बिबट्याच्या दिशेने वळवला. त्यानंतर, बिबट्याने तेथून दुसऱ्या शेतात धूम ठोकली. यापूर्वी वाघमारे वस्ती परिसरात दीपक कौठाळे, तसेच ग्रामस्थांनी बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.