कर्जत शहराजवळ बिबट्याचे दर्शन

By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:17+5:302020-12-05T04:34:17+5:30

कर्जत : शहराजवळ पळसवाडा परिसरात उसाच्या शेतालगत बुधवारी सकाळी गुराख्याला बिबट्या दिसला. त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तो बिबट्याचा ...

Leopard sightings near Karjat city | कर्जत शहराजवळ बिबट्याचे दर्शन

कर्जत शहराजवळ बिबट्याचे दर्शन

कर्जत : शहराजवळ पळसवाडा परिसरात उसाच्या शेतालगत बुधवारी सकाळी गुराख्याला बिबट्या दिसला. त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तो बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वनक्षेत्रपाल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर तो बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

कर्जत शहरालगतच्या पळसवाडा परिसरात बुधवारी सकाळी गोरे वस्तीवरील गुराखी जनावरे चारत होते. यावेळी कृष्णा सोनमाळी यांना दीपक तोरडमल यांच्या उसाच्या शेतातून बाहेर येत असताना एक अनोळखी प्राणी दिसला. हा बिबट्या तर नाही ना, अशी शंका त्यांना आली. कृष्णा सोनमाळी यांनी त्याला दगड मारला. तेव्हा बिबट्या अंगावर धावून आला. मात्र, त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या मागे फिरला. त्यानंतर सोनमाळी यांनी मोबाईलमध्ये त्या बिबट्याचे शूटिंग केले. त्यानंतर हा प्रकार त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शरद म्हेत्रे यांना सांगितला. नंतर म्हेत्रे यांनी वनक्षेत्रपाल सागर केदार यांना या घटनेची माहिती दिली.

केदार यांनी सहकाऱ्यांसह पळसवाडा गाठला. या परिसरात त्यांनी पाहणी केली. यावेळी शरद म्हेत्रे, नंदकुमार लांगोरे, दीपक तोरडमल, तात्यासाहेब गोरे, अनिल नाचण, दशरथ गोरे, शुभम गोरे, वनरक्षक दिलीप तोरडमल, वनपाल नितीन शिंदे आदी उपस्थित होते. येथे असलेल्या पाणवठ्यावर व उसाच्या शेतालगत असलेल्या भागातील ठसे तपासणी केली. यामध्ये हे ठसे बिबट्याचे आहेत, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. शिवाय या भागात बिबट्याची मादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल केदार यांनी केले. याशिवाय वन विभागाने कर्जत तालुक्यातील कुंभेफळ, पाटेवाडी, बहिरोबावाडी या भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर पाहणी केली. या परिसरात कोठेच काही आढळले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

कोट..

पळसवाडा हा परिसर प्रादेशिक वन विभागाच्या अंतर्गत आहे. त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वन्यजीव विभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून पाहणी केली.

-सागर केदार,

वनक्षेत्रपाल, रेहकुरी अभयारण्य

फोटो ०२

कर्जतजवळील पळसवाडा परिसरात बिबट्यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना वनक्षेत्रपाल सागर केदार व कर्मचारी.

Web Title: Leopard sightings near Karjat city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.