भेंडा परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:15 AM2020-12-27T04:15:29+5:302020-12-27T04:15:29+5:30
भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथे बिबट्याने तीन शेळ्यांची शिकार करून एकाला पहाटे दर्शन दिल्याने परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत ...
भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथे बिबट्याने तीन शेळ्यांची शिकार करून एकाला पहाटे दर्शन दिल्याने परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे.
तीन वर्षांपूर्वी भेंडा परिसरात बिबट्याचा वावर होता. भेंड्यातून तीन बिबटे जेरबंद करून त्यांना जंगलात सोडले होते. ज्ञानेश्वर कारखान्याचे कर्मचारी शिवाजी भातंबरे (रा. चिलेखनवाडी) हे गुरुवारी रात्रपाळी करून घरी जात असताना नेवासा-शेवगाव रस्त्यावर मळीच्या ओढ्यापासून पुढे रस्त्यावर बिबट्या दिसला. त्यांनी दुचाकीचा वेग कमी करून गाडीच्या उजेडात बिबट्याला रस्ता ओलांडताना पाहिले. याच रात्री बिबट्याने तेजस बाबासाहेब भागवत यांच्या तीन शेळ्यांची शिकार केली. शुक्रवारी वनविभागाचे कर्मचारी भीमराज पाठक यांनी दोन शेळ्या खाल्ल्याचा पंचनामा केला. तिसरी शेळी उसाच्या शेतात ओढत नेवून फस्त केल्याचे भागवत यांनी सांगितले. परंतु, मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पंचनामा करण्यात आला नाही. बिबट्याने ज्या शेळीची शिकार केली. त्याच शेळीमुळे तीन वर्षांपूर्वी दोन बिबटे पिंजऱ्यात अडकल्याची माहिती बाबासाहेब भागवत यांनी दिली. मात्र, बिबट्याने त्या शेळीला फस्त केले आहे.
नागापूर जंगलाशेजारी असलेल्या उसाच्या शेतात शुभम गुजर यांनी बिबट्या पाहिल्याने नागापूर व भानसहिवरा शिवारात बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्री शेतीची कामे करायला कोणीही तयार नाही. यामुळे अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.