जेऊर परिसरात बिबट्यांची दहशत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:24 AM2021-08-21T04:24:58+5:302021-08-21T04:24:58+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने आता मानवी वस्तीकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने आता मानवी वस्तीकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे. चाफेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात दोन बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाला होता. भिवा घुले यांच्या मेंढ्यांच्या पालावर बिबट्याने हल्ला करून मेंढ्यांचा तसेच कुत्र्याचा फडशा पाडला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाफेवाडी परिसरात मानवी वस्तीत बिबट्याने दर्शन दिले तर शेटे वस्ती येथील नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली आहे. तरी बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेऊर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात मेंढपाळ भिवा बिरू घुले हे आपल्या मेंढरांसह पाल ठोकून राहत होते. सोमवारी (दि.१६) रात्री बिबट्याने त्यांच्या मेंढ्यांवर हल्ला करत दोन मेंढ्या ठार केल्या. घुले यांनी आरडाओरडा करत बिबट्यांना हुसकावून लावले. दोन बिबटे असल्याचे घुले यांनी सांगितले. नंतर पुन्हा पहाटेच्या सुमारास दोन्ही बिबट्यांनी पालावर हल्ला करत एक मेंढी व कुत्र्याची शिकार केली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, मिठू ससे, सुभाष पवार, विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात यापूर्वीही बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिले आहे.
----
वनविभागाच्या वतीने गस्त..
जेऊर परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, दाणी, मुकेश साळवे यांच्या पथकाने परिसरात गस्त घालून पाहणी केली. वनविभागाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
पिंजरा लावण्याची मागणी
शाळा बंद असल्याने लहान मुले डोंगरात गुरे चारण्यासाठी जात आहेत. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाकडून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी केली आहे.
---------
जेऊर परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून गुराखी, शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा.
-राजश्री मगर,
सरपंच, जेऊर