नांदूर शिकारी गावात बिबट्याची दहशत; शेतक-यांचे आवर्तन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:55 AM2020-05-15T11:55:13+5:302020-05-15T11:55:48+5:30
मुळा धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू असते. यंदा मात्र ऐन नांदूर शिकारी गावात बिबट्याने ठाण मांडले आहे. हा बिबट्या दररोज जागा बदलत असल्याने या भागातील सुकळी, मठाचीवाडी, पिंपरी शहाली गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकरी धावस्तावले आहेत. त्यामुळे पाणी असूनही शेताला पाणी देता येत नाही.
अहमदनगर : मुळा धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू असते. यंदा मात्र ऐन नांदूर शिकारी गावात बिबट्याने ठाण मांडले आहे. हा बिबट्या दररोज जागा बदलत असल्याने या भागातील सुकळी, मठाचीवाडी, पिंपरी शहाली गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकरी धावस्तावले आहेत. त्यामुळे पाणी असूनही शेताला पाणी देता येत नाही.
मुळा लाभक्षेत्रातील नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी गावात बिबट्याने एका बकरीचा फाडशा पाडला़ बिबट्या दहशत चांगलीच वाढली. या भागात उसाचे पिक असल्याने बिबट्या दिवसभर उसाच्या शेतात लपून बसतो आणि रात्रीच्यावेळी बाहेर पडतो, अशी चर्चा या भागातील नागरिकात आहे. बिबट्याच्या भितीने शेतकरी उसाला पाणी देण्यासही जात नाहीत. शेतक-यांनी वनखात्याकडे तक्रार करूनही उपाययोजना होत नाहीत़ पंधरा दिवसानंतर वनखात्याने पिंजरा लावला़ पण बिबट्या अजून गळाला लागलेला नाही. अनेक शेतक-यांना बिबट्याचे दर्शन झाले, असे गावक-यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यात पाटाचे पाणी मर्यादीत कालावधीसाठीच असते. हा बिबट्या जागा बदलत असल्याने बिबट्या येतो की काय, या भितीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वनखात्याने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.