निमगाव वाघा येथे बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:33+5:302021-06-16T04:29:33+5:30
पायांचे ठसे आढळून आल्याने वन विभागाने या भागात लावला पिंजरा केडगाव : निमगाव वाघा (ता.नगर) येथे बिबट्याचा वावर असल्याने, ...
पायांचे ठसे आढळून आल्याने वन विभागाने या भागात लावला पिंजरा
केडगाव : निमगाव वाघा (ता.नगर) येथे बिबट्याचा वावर असल्याने, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने, तेथे पिंजरा लावल्याची माहिती नगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी दिली. निमगाव वाघा गावाच्या शिवारातील जावळी व भगत मळा परिसरातील शेतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क केला. मात्र, वनविभागाचे कोणीही या ठिकाणी आले नाही. त्यानंतर, सरपंच रूपाली जाधव व ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांनी वनविभागात जाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानंतर, वनपाल गावडे, वनसंरक्षक अढागळे आणि वनमजूर येणारे यांच्या पथकाने सोमवारी (दि.१४) या परिसरात पिंजरा लावला.