संशयकल्लोळ : तुरूंगातून कैदी पळाले, तसा बिबट्याही पिंजऱ्यातून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:15 IST2025-03-22T11:15:33+5:302025-03-22T11:15:59+5:30

पंचवीस किलोचे गेट उचलून बिबट्या पळाला कसा?

leopard trapped in a cage in Rahuri was rescued by its colleagues | संशयकल्लोळ : तुरूंगातून कैदी पळाले, तसा बिबट्याही पिंजऱ्यातून पळाला

संशयकल्लोळ : तुरूंगातून कैदी पळाले, तसा बिबट्याही पिंजऱ्यातून पळाला

राहुरी : कैद्यांनी तुरुंगाच्या सळया कापून पलायन केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, चक्क बिबट्या लोखंडी पिजन्यातून सुटका करून पळाला. ही सुटकाही दुसरी तिसरी कुणी नव्हे तर त्याच्या साथीदार बिबट्यांनीच केली म्हणतात.

बातमी वाचून धक्का बसेल. पण अशी घटना घडली आहे. राहूरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरात बिबट्यांचा उपद्रव आहे. म्हणून तेथे पिंजरा लावला होता. बुधवारी रात्री या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला.

चार बिबटे आले मदतीला

सकाळी पिंजऱ्यात अडकलेला पहिला बिबट्या गायब होता. इतर तीन-चार बिबट्यांनी पिंजऱ्याला धडका देऊन या बिबट्याची सुटका केली असे ग्रामस्थ व वनविभागाचेही म्हणणे आहे.

यासंदर्भात राहूरी वनक्षेत्राचे वनपाल युवराज पाचारणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बिबट्या पिंजऱ्यातून पळाला या वृत्तास दुजोरा दिला. इतर चार बिबटे तेथे आले. त्यांनी पिंजऱ्याच्या लोखंडी गेटची तार वाकवली. तसेच पंचवीस ते तीस किलोचे गेट उचलले. त्यामुळे आत अडकलेला बिबट्या निसटला, असे त्यांचे म्हणणे आहे.

काही ग्रामस्थ सांगतात की, रात्री उशिरा लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यातही एक बिबट्या अडकला होता, कारण त्या पिंजऱ्यात व पिंजऱ्याभोवतीही बिबट्याची पावले दिसतात. मात्र तोही बिबट्या आपल्या इतर साथीदारांनी पिंजऱ्यातून सोडवून नेला. वनविभागाने मात्र दुसराही बिबट्या अडकला होता याचा इन्कार केला आहे.

बिबट्याने गेट कसे उचलले?

पिंजऱ्याच्या लोखंडी दरवाजाचे वजन २५ ते ३० किलो असते. एवढे गेट बिबट्यांनी कसे उचलले? असा प्रश्न 'लोकमत'ने वनपाल युवराज पाचारणे यांना केला असता ते म्हणाले, बिबट्या हा ताकदवान प्राणी आहे. तो दहा, पंधरा किलोची शेळी उचलतो. त्यामुळे तो पिंजऱ्याचे गेटही उचलू शकतो. आमच्यादृष्टीने ही खूप दुर्मिळ घटना आहे. बिबटे पिंजऱ्यातून निसटत असतील तर पिंजऱ्यांच्या दर्जाबाबतही शंका आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

आणखी बिबटे दिसल्याने पिंजरे वाढविण्याची मागणी 

रात्री या परिसरात आणखीही बिबटे ग्रामस्थांना दिसले. ते या पिंजऱ्याभोवती येत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करुन आणखी पिंजरे तत्काळ लावण्याची मागणी केली. वनविभाग आणखी पिंजरे लावण्यास तयार नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ व वन कर्मचारी यांच्यात वाद झाला होता.
 

Web Title: leopard trapped in a cage in Rahuri was rescued by its colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.