संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:17 PM2018-08-18T17:17:51+5:302018-08-18T17:17:57+5:30
संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला.
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला. बिबट्यांच्या वास्तव्याने मालदाड पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वनविभागाने दक्षता घेत बिबट्यांना पकडण्यासाठी रामभाऊ शिवराम नवले यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. अखेर शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजºयातील कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात मादी बिबट्या अलगद पिंजºयात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे जयराम दिघे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. संगमनेर वनविभाग क्रमांक २ चे वनक्षेत्रपाल बी.एल.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक वाय.आर.डोंगरे व पुंड या वनकर्मचाºयांच्या मदतीने जेरबंद बिबट्यास शनिवारी सकाळी निंबाळे येथील नर्सरीत हलविण्यात आले. बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याच्या वास्तव्याने मालदाड पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. मालदाड शिवारात अजून दोन बिबट्यांचे वास्तव्य असून त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावावेत, अशी मागणी युवक कार्यकर्ते विपूल नवले, जयराम दिघे, साईनाथ नवले, संदीप नवले, दिनकर नवले सहित ग्रामस्थांनी केली आहे.
मालदाड शिवारात पकडलेला मादी बिबट्याला निंबाळे नर्सरीत हलविण्यात आला आहे. सदर बिबट्याला माणिकडोह (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील वनविभागाच्या बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. -अंबादास मेहेत्रे, वनपाल, वनविभाग, संगमनेर.