पंतप्रधान-संभाजी भिडे यांच्यातील कनेक्शन उघड करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:01 PM2018-01-28T22:01:01+5:302018-01-28T22:01:50+5:30
कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़
अहमदनगर: कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़
पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव-भीमा प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यापुरते हे प्रकरण सिमित नाही़ जी भिडेंची प्रवृत्ती आहे़, तीच प्रवृत्ती करणीसेनेची आहे़ संभाजी भिडे यांना पंतप्रधानच पाठिशी घालत आहेत, असा आपला सुरुवातीपासूनचा आरोप आहे़ या दोघांच्या संबंधाचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत़ ते सादरदेखील केलेले आहेत, असे सांगून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील़ इथे न्याय मिळाला नाही, तर हे भांड कुठे घेऊन जायचे तिथे ते घेऊन जाऊ, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला़
राज्यातील जातीय दंगलीवरही त्यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामीकडे सुरू आहे़ राज्यातील अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या आहेत़ अनियंत्रित व नियंत्रित हिंदू संघटनांमध्ये भांडण सुरू झाले असून, त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे़ या भांडणाची झळ मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांना बसत नसून, मध्यमवर्गीय सवर्ण हिंदूंनाच बसत आहे़ हिंदू संघटनांतील हे भांडण सवर्ण हिंदूंच्या दारात येऊन पोहोचले आहे़ वादाचे उत्तर कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही़ ते सवर्ण हिंदंूकडेच आहे़ त्यांनीच काय ते ठरावावे, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले़ कॉ़ बाबा आरगडे, अनंत लोखंडे, अशोक सोनवणे, अरुण जाधव, संध्या मेंढे आदी यावेळी उपस्थित होते़
़़़़़
शरद पवारांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासावे
राष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्यवान व्यक्ती एकत्र येत असतात़ समविचारी पक्षांना एकीची हाक देणाºयांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे़ निवडणुकीनंतर सेना-भाजपा सोबत जाण्यास तयार नव्हती़ तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला होता, ही बाब विसरून चालणार नाही़ शरद पवार यांनी आपले राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. संविधान बचाव रॅलीसाठी पवार यांच्यासोबत जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली़