गगन सारे घुमू दे़
By Admin | Published: September 7, 2014 11:31 PM2014-09-07T23:31:37+5:302023-07-15T17:56:36+5:30
अरुण वाघमोडे, अहमदनगर गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक फक्त पुण्यातच दिसत होते. मात्र या पारंपारिक वाद्यांचा बोलबाला आता नगरमध्येही घुमू लागला आहे.
अरुण वाघमोडे, अहमदनगर
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक फक्त पुण्यातच दिसत होते. मात्र या पारंपारिक वाद्यांचा बोलबाला आता नगरमध्येही घुमू लागला आहे. युवकांनी संघटित होत रोजगाराचा नवा मार्ग शोधला आहे. पारंपारिक उत्सव, सामाजिक बांधिलकी आणि रोजगार असा सुरेख संगम साधत नगरच्या युवकांनी कल्पकता वापरून गणेशोत्सवात ढोल-ताशांचा ‘आवाज’ केला आहे.
भक्ती, उत्साह, झगमगाट अन् गजर या चार बाबींच्या संगमात लाडक्या गणरायांचा सोहळा साजरा होतो़ गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीत अबालवृध्द गणरायासमोर तल्लीन होवून नाचतात़ तर काही जण गणरायांसमोर वाजविल्या जाणाऱ्या संगीताचा आस्वाद घेतात़ मात्र, मध्यंतरी वाद्यांचा आस्वाद ही बाब नामानिराळी झाली होती़ डीजेचा कर्णकर्क श आवाज छातीचा ठोका चुकवित होता़ यंदा मात्र, प्रथमच सर्वच मंडळांच्या दरबारात ढोल-ताशांचा गजर झाला आणि नगरकरांना हायसे वाटले़ हायटेक तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून निर्माण झालेली इलेक्ट्रॉनिक वाद्य श्रवणीय संगीताचा आस्वाद देतात तर अनेक वेळा कर्णकर्कश आवाजामुळे छातीचे ठोकेही वाढवितात़ म्हणूनच याला पर्याय म्हणून यंदा गणेशोत्सवात बहुतांशी गणेश मंडळांनी महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य ढोल-ताशा आणि झांज पथकाला पसंती दिली़ श्रीं च्या प्रतिष्ठापनेपासून ते आरास उद्घाटन, दहा दिवसांतील विविध कार्यक्रम व शेवटी विसर्जन मिरवणुकीतही ढोल-ताशांचाच निनाद घुमणार असल्याने यंदाचा गणेशोत्सव सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे़ गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविणे ही खूप जुनी परंपरा आहे़ आजही अनेक गणेश मंडळांकडे स्वत:चे ढोलपथक आहे़ मात्र, मध्यंतरीच्या सहा सात वर्षात या ढोल-ताशांवर डी़जे़ सिस्टिमने आक्रमण केले़ प्रशासनाने आवाजाची घालवून दिलेली मर्यादा कोणीच पाळत नसल्याने उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढते याचा वृध्द व लहान मुलांना मोठा त्रास होतो़ यावर्षी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने गणेश मंडळांनी ढोल पथकालाच पसंती दिली़ डीजे न वाजविण्याचा निर्णय खूप सकारात्मक बदल आहे़ नगरजवळ असलेल्या पुणे शहरात सुमारे ३०० नोंदणीकृत ढोल पथक आहेत़ नगर शहरात मात्र, सध्या तरी केवळ तीन पथके नोंदणीकृत आहेत़ हौशीखातर शहरातील गणेश मंडळांच्यावतीने पुणे येथील ढोल पथकांना आमंत्रित केले जायचे़
यंदा मात्र, नगर शहरात रुद्रनाथ, तालयोगी व रिदम हे पुण्याच्या तोडीचे ढोलपथक उपलब्ध झाल्याने सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा प्रश्न मार्गी लागला़
ट्रॅडिशनल ते मॉडर्न
ढोल-ताशा, झांज व डोलीबाजा ही पारंपरिक वाद्य समजली जातात़ मात्र, या वाद्यांचा आता पारंपरिक ते आधुनिक असा प्रवास सुरू झाला आहे़ एकेकाळी विशिष्ट समाजातील लोकंच सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजविण्याचा व्यवसाय करावयाचे आज मात्र, आवड म्हणून सर्वच क्षेत्रात काम करणारे ढोल-पथकात सहभागी होत आहेत़
युवतींचाही ताल
डोक्यावर फेटा, कपाळाला गंध आणि हातात टिपरी घेऊन युवती व महिलाही ढोल-ताशांचा गजर करत आहेत़ शहरातील रुद्रनाथ व तालयोगी ढोलपथकात मोठ्या संख्येने युवतींचा सहभाग आहे़ महाविद्यालयीन युवती, नोकरी करणाऱ्या आणि गृहिणींचा या पथकांमध्ये सहभाग आहे़
हायटेक व्हरायटीज्
रुद्रनाथ ढोलपथकाचा २०० जणांचा ग्रुप असून, त्यांनी हायटेक व्हरायटीज्मधील स्वनिर्मित सात ताल निर्माण केले आहेत़ त्यामध्ये रुद्रनाथ स्पेशल, पूर्ण खेळ, राजा शिवछत्रपती ताल, शंखनाद, बॉलिऊड साऊंड, रॉक म्युझिक व रामलखऩ ढोलपथकावर हे ताल ऐकताना अंगावर शहारे येतात़
गणरायासमोर विविध वाद्य वाजविले जातात मात्र, महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा मागे पडत चालले होते़ कारण त्यात लोकांना अपेक्षित असा बदल झालेला नव्हता़ जर तुम्ही वेगळे दिले तर लोक त्याचा स्वीकार करतात़ म्हणूनच नगर शहरात पुण्याच्या धर्तीवरच ढोलपथक स्थापन करावे, असा निर्णय घेतला़घराघरात गणेशोत्सव साजरा केला जातो़ गणरायांच्या समोर ढोल वाजवावा हा सर्वोच्च आनंद असतो़ विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र करून ढोलपथकाची स्थापना केली़ हे पथक फक्त हौस म्हणून नाही तर प्रोफेशनल होईल याचीही काळजी घेतली़ लोकांकडून आज चांगला प्रतिसाद मिळत आहे़
-प्रशांत मुनफन,रुद्रनाथ ढोल पथक