भिंगारनाला जमीन घोटाळ्याचा तपास एलसीबीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:40 PM2018-06-16T17:40:16+5:302018-06-16T17:40:22+5:30
बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग झाला आहे.
अहमदनगर : बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग झाला आहे.
गेल्याच आठवड्यात सारसनगर येथील हे प्रकरण उघडकीस आले. माळीवाडा हद्दीतील सर्व्हे क्रमांक १३५ व १३६ मधील १ एकरपेक्षा जास्त जमिनीसंदर्भात बनावट अभिलेख तयार करून शासकीय कार्यालयातील अधिकाºयांना हाताशी धरून ही जमीन शहरातील एका नामांकित बिल्डरला विकण्यात आली. ही जमीन बिल्डरने एऩए़ करून घेत तेथे गृहप्रकल्प तयार करून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. दरम्यान या जमिनीसंदर्भात पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर विक्री झालेल्या जमिनीत किती पक्की बांधकामे झाली आहेत, हे समोर येणार आहे.
बिल्डरांच्या जमीन घोटाळ्याबाबत मूळ तक्रारदार शाम कोके यांनी सर्व कागदपत्रांची जुळणी करून लोकायुक्त (मुंबई) यांच्याकडे तक्रार केली़ लोकायुक्तांच्या आदेशानंतर महसूल यंत्रणेला जाग आली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.
शहरातील काही प्रतिष्ठित बिल्डरांची नावे यात आहे़ असे असताना गुन्ह्यात मात्र आरोपी अज्ञात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे़ जमीन घोटाळ्यात बिल्डरांना तत्कालीन कामगार तलाठी, मंडलाधिकारी, दुय्यम निबंधक, नगर रचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक आदी अधिका-यांचा समावेश आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर त्या बिल्डरने शहरातील एका बँकेतून त्या जमिनीवर १५ कोटी रूपयांचे कर्जही घेतलेले आह.या सर्व बाबींचा तपास आता एलसीबीला करावा लागेल. यातून मोठा जमीन घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.