व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र; कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:19 PM2020-02-08T14:19:56+5:302020-02-08T14:21:20+5:30
सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मौख्यिक आरोग्य दिन विशेष/अरुण वाघमोडे/
अहमदनगर : भारतात दरवर्षी नव्याने १५ ते १७ लाख लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. यातील ४० टक्के लोकांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरची लागण होते. सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़.
जागतिक कर्करोग दिन व मौखिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. सोनवणे यांच्याशी बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, कॅन्सरची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यत: तंबाखूचे सेवन, सिगारेट, विडी, गुटखा व दारु यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त विविध रसायनांचे शरीरावर होणारे परिणाम, जंतूसंसर्ग, शरीराच्या एखाद्या भागाला वारंवार होणारी जखम, शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण, रेडिएशन आदी कारणांमुळेही कॅन्सर होतो. भारतात २५ कोटी तर महाराष्ट्रात अडीच कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील २५ टक्के लोकांना कॅन्सरची बाधा झालेली आहे. यावरून तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम आपल्या निदर्शनास येतात.
सध्या महाराष्ट्रासह भारतात शासकीय यंत्रणा व विविध सामाजिक संस्थांकडून तंबाखूजन्य पदार्थांबाबत प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. मात्र यात आणखी व्यापकता यावी, महाराष्ट्रात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पालकांनीही दक्षता घेत आपला पाल्य व्यसनापासून दूर राहिल याची काळजी घ्यावी़. ज्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आत्मविश्वास असेल तर कुठलेही व्यसन सोडणे शक्य आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याची मात्र प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही़.
शरीरात कोणत्याही भागात अचानक आलेली गाठ, कातडी,ओठ, जीभ आदी ठिकाणी होणारी जखम, गिळण्याचा त्रास अथवा अन्न उलटून पडणे, औषधांनी बरी न होणारी जखम, औषधांना दाद न देणारा खोकला किंवा घशात घोगरा आवाज येणे किंवा आवाजात पडलेला फरक, अपचन, अवेळी अचानक रक्तस्त्राव, लघवी, शौचाच्या सवयीत अचानक बदल, आदी कॅन्सरची लक्षणे आहेत. सध्या कॅन्सरवरील विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सर झाला तर खचून न जाता कॅन्सर तज्ज्ञांकडून योग्यवेळेत उपचार घ्यावेत. वेळेत व योग्य उपचारातून अनेक कॅन्सरग्रस्त बरे झालेले आहेत. प्रत्यक्षात मात्र कॅन्सर होऊच नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ़ सतीश सोनवणे यांनी केले आहे.