पैशासाठी मित्राचा खून करणा-या तिघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:44 PM2018-04-26T18:44:28+5:302018-04-26T18:44:53+5:30
श्रीरामपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत त्याचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या तिघा युवकांना येथील जिल्हा व ...
श्रीरामपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत त्याचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या तिघा युवकांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैैशासाठी महाविद्यालयीन युवकांनी केलेल्या या कृत्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धिरज शंकर शिंदे यांचा समावेश आहे. त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यासह तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडातील दहा हजार रुपये मयताची आई मिनाक्षी चांदगुडे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मयत गणेश चांदगुडे (रा.मूळ चासनळी, ता.कोपरगाव) हा मातापूर येथील त्याचे मामा सुनील सीताराम दौंड यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. तो श्रीरामपुरातील बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेत होता. १२ मार्च २०१५ रोजी त्याने मित्र पराग पटारे याच्या घरी अभ्यासासाठी जातो असे सांगून बाहेर पडलेला गणेश पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांना खबर देण्यात आली.
आरोपींनी गणेश याला नेवासे फाटा येथे दारू पाजून औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीत नेत तेथे त्याचा दगडाने ठेचून खून केला. हत्येनंतर मृतदेह रॉकेलने पेटवून देण्यात आला. ही घटना जिल्हाभर गाजली. सरकारच्या वतीने या खटल्यात २६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्या सर्वच निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयात सरकार पक्षाकडून अॅड.भानुदास तांबे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.प्रसन्न गटणे यांनी सहाय्य केले.
हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. त्यात कुठलाही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मयताच्या आईला आलेल्या मोबाईलवरील मेसेज व मयताच्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्ह्याचा तपास लागला. सरकारी वकिलांनी पुराव्याची साखळी साक्षीदारांना तपासून जुळविली. न्यायवैैद्यक प्रयोगशाळेची मोठी मदत झाली. मोबाईलवरील मेसेज सीडीमध्ये रुपांतरित करून ती न्यायालयात लॅपटॉपवर पाहण्यात आली. त्यावरून खटल्याचा निकाल देण्यात आला.