कोल्हारमधील सराफास लुटले, तेरा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:48 IST2018-04-14T17:47:33+5:302018-04-14T17:48:14+5:30
दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली.

कोल्हारमधील सराफास लुटले, तेरा लाखांचा ऐवज लंपास
कोल्हार(राहुरी) : दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली.
कोल्हार येथील माधवराव खर्डे चौकातील कापड बाजारात सुभाष सुपेकर यांचे सुपेकर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे सुपेकर दुकान उघडण्यासाठी आले. दुकानाच्या दोन शटरपैकी पहिले शटर सुपेकरांनी उघडले. दुसºया शटरचे कुलूप उघडत असताना त्यात चिकट द्रवपदार्थ व त्यात काड्या खोचलेल्या आढळल्या. कुलूप उघडण्याच्या प्रयत्नात त्यांचा वेळ गेला. दरम्यान दुकानाबाहेर मोटार सायकलवर पाळत ठेवून उभे असलेल्या दोघांपैकी एकाने संधी साधून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेली सोन्या चांदीचा ऐवज असलेली बॅग घेऊन पलायन केले. बॅग घेऊन हा चोरटा बाजारपेठेच्या पूर्वेस असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरजवळ गेला. त्यानंतर पाठीमागून मोटर सायकलवर आलेल्या दुसरा साथीदारासह पलायन केले. दरम्यान शटर उघडून दुकानात प्रवेश केल्यानंतर सुपेकरांना बॅग गायब झाल्याचे आढळले.
चोरट्यांनी लंपास केलेल्या बॅगेत सुमारे ११ लाख रूपये किंमतीचे ३४ तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रूपये किंमतीचे साडेचार किलो चांदीचे दागिने व ४२ हजार रूपयांची रोकड असा एकूण तेरा लाख रूपयांचा ऐवज होता. लोणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासाची चक्रे फिरवून आसपासच्या दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तसेच विठ्ठल मंदिरासमोरील फुटेज तपासले. त्यात घटनाक्रम व चोरट्यांच्या हालचाली दिसून आल्या. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार भालचंद्र शिंदे तपास करीत आहेत.