ऐकावे ते नवलच! राहुरीत शेतक-यांनी काढला गाढवांविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:10 PM2017-12-05T17:10:31+5:302017-12-05T17:13:58+5:30
वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली.
राहुरी : वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली. त्याला कारणही तसेच आहे. ही गाढवे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.
प्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. वाळू वाहून झाल्यानंतर या गाढवांना मोकळे सोडून दिले जाते. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी हरिश्चंद्र मुठे व मंडल आधिकारी बी. एल. वडीतके यांच्यावर शेतक-यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत गाढव मालकांवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला.
यापूर्वी शेतक-यांनी गाढवांच्या मालकांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मालकांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. गाढवांवरुन अवैद्यरित्या वाळू उपसा करायचा आणि वाळू उपसा झाला की गाढवांना मोकाट सोडून द्यायचे, या वाळू वाहतूकदारांच्या आठमुठे धोरणाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाट, गणेश राऊत, रवींद्र शिरसाट, संजय भोसले, प्रकाश चिखले आदी सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश पाटील यांनीही गाढवांमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज व्यक्त केली.
गाढवामुळे शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाढवांच्या मालकांची यादी तयार केली जाईल. तयार केलेली यादी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे पाठविण्यात येईल. संबंधीतावर त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदी पात्रात असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून वाहतुकीला प्रतिबंध केला जाईल.
-हरिश्चंद मुठे, कामगार तलाठी
-बी. एल. वडीतके, मंडल अधिकारी