साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी लेबल नसावे - पंकज चांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:13 PM2018-02-14T19:13:10+5:302018-02-14T19:13:30+5:30
समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.
संगमनेर : समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.
नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या सुधा-कुसूम पुरस्काराने संगमनेरचे साहित्यिक अनिल देशपांडे यांना गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी त्यांच्या मानवी कर्तृत्वाचा वेध घेणा-या ‘कर्मयोगी’ कादंबरीची झाली निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. चांदे बोलत होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, शैलेश पांडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, कविता शनवारे आदी मंचावर उपस्थित होते.
पद्मगंधाच्या अध्यक्षा भडभडे यांनी पद्मगंध प्रतिष्ठानचा गेल्या २५ वर्षांचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रतिभावंत साहित्यिकांचा भरणा असून त्यांच्या साहित्यकृतींना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. संगमनेरच्या देशपांडे यांची कर्मयोगी ही कांदबरी मानवी कर्तृत्वाचा वेध घेणारी आहे. त्याच्या चिंतनातून समाजाच्या प्रतिची कणव प्रवाहित होत असल्याचे भडभडे म्हणाल्या. पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ब्राह्मणकर यांनी प्रास्तविक केले. वसुधा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संगीता वाईकर यांनी आभार मानले.