पडझडीच्या काळात साहित्यच सावरण्याचे काम करेल : अरूणा ढेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 06:23 PM2019-08-14T18:23:24+5:302019-08-14T18:23:29+5:30
इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे,
लोणी : इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे, असे सांगतानाच नवलेखक, साहित्यिक जीवनाचे आकलन करीत वर्तमानात जगण्यासाठी जे गरजेचे आहे ते आपल्या लेखनातून पुढे घेऊन जात आहेत. समाजात जेव्हा सगळीकडून पडझड होईल तेव्हा या नवलेखकांच्या साहित्याकडे समाज एक आश्वासक साहित्य म्हणून बघेल, असे स्पष्ट मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती निमित्ताने बुधवारी आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. ढेरे बोलत होत्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर कदम, विजय वहाडणे, अनुराधा आदिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या‘जुगाड’ कादंबरीस प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य गौरव पुरस्कार प्रा.गो.तु.पाटील (येवला) यांच्या ‘ओल अंतरीची’या आत्मचरित्रास तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या ‘दिवस आलापल्लीचे’ या ललित लेखनास देण्यात आला. जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ.शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या कवितासंग्रहास यावेळी देण्यात आला.
कलेच्या सेवेसाठी असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार धनंजय गोवर्धने (नाशिक) यांना तर समाज प्रबोधन पुरस्कार शमशुद्दीन तांबोळी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे (जालना) यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.
ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.
खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्काराची घोषणा केली. आभार विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन दिनेश भाने व गायत्री म्हस्के यांनी केले.
पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी एक प्रकारे क्रांती निर्माण केली. डॉ.बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली पुरस्काराची ही परंपरा द्रष्टेपणाची आहे. या पुरस्कारामुळे लेखनाचा उत्साह अधिक वाढला आहे. -डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक.
प्रवरा परिवाराकडून पूरग्रस्तांना एक कोटी
प्रवरा परिसराने सदैव सामाजिक प्रश्नांना आपले माणून मार्गक्रमण केले. समाजाची दु:ख आपली मानली. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, विखे पाटील फाउंडेशन आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने १ कोटी रुपयांची वस्तुरुपी मदत करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी जाहीर केले.