माझ्या रक्तात लाचारी नाही, उद्धव ठाकरे बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:00 PM2018-10-21T13:00:41+5:302018-10-22T14:51:18+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत.
अहमदनगर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघ पिंजून काढणार आहेत. याची सुरुवात आज शिर्डीतून झाली आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी शिर्डीत आले. लोकांसाठी काही मागण्याऐवजी स्वत:साठी सर्व काही मागितले. त्या दिवशी ते मराठीत बोलले. कसं काय, बरं आहे का असे विचारून त्यांनी महाराष्ट्राची थट्टा केली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पुढे ते असंही म्हणाले की, साईबाबांच्या चरणी लोकांसाठी आशीर्वाद मागितला. मला खुर्ची, पदाची लालसा नाही. माता-भगिनी आणि बांधवाचे प्रेम मला कायम मिळावे, असा आशीर्वाद मी मागितला. तुमच्या आयुष्यात सुखसमाधानाचा गारवा येऊ द्या. असा आशीर्वाद मी साईबाबांकडे मागितला. पण काही लोकांंनी स्वत:साठीच आशीर्वाद मागितला, अशी टीका ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. सगळीकडे दुष्काळ आहे. सत्तेतून कधीही बाहेर पडू शकतो. सत्तेत असल्यानंतर डोक्यावर बसून तुमची कामे करुन घेता येतात.
रक्तात लाचारी नाही -उद्धव ठाकरे
लाचारी आमच्या रक्तात नाही. तुमच्याकडून आम्हाला महाराष्ट्राची अन देशाची सत्ता हवी आहे. सगळीकडे जाहिरातींचा बोलबाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीत बोलण्याचे नाटक करतात. ही केवळ जुमलेबाजी आहे. राम मंदिरासाठी किती दिवस वाट पाहायचे. अनेक दिवसांपासून राममंदिरासाठी शिवसेना लढत आहे. आम्हाला पाणी देत असाल, दुधाला भाव देत असाल तर ५०० वर्षे सत्ता देऊ. भाजपा सरकार खोटे बोलत आहे. खोटे बोलूनच त्यांनी सत्ता मिळवली. मंदिर नहीं बनायेंगे असे एकदाचे सांगून टाका, असेही ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
ट्रेनिंग देऊन पंतप्रधान मोदी खोट बोलवून घेत आहेत. आपल्याला खरे काय ते बाहेर आणायचे आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुका पार पडतील. मग कळेल प्रधान सेवक आहेत की त्यांचे सेवक. पराभव झाल्यानंतर देशाचा कारभार सोडून मते मागत फिरतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, मेळाव्यामध्ये शिवसेैनिकांना संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी मंदिराचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने ठाकरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. या दौ-यात ठाकरे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहे. आज पहिला शिवसैनिकांचा मेळावा शिर्डीत संपन्न झाला.
शिवाय, व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांनी शिव प्रतिमा, राम प्रतिमा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.