दावणीला गायी नसताना कर्ज वाटप; अहमदनगर जिल्हा बँकेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:49 AM2020-11-21T11:49:33+5:302020-11-21T11:50:45+5:30
दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.
अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा, औषधे यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी दोन गायींसाठी एकरी तीस हजार रुपये कर्ज देणारी ही योजना आहे. पाच एकर शेतीपर्यंत हे कर्ज मिळते. म्हणजे पाच एकर शेती व दहा गायी असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये कर्जरूपात मिळू शकतात. या कर्जास सात टक्के व्याजदर असून, नियमित कर्ज भरल्यास यातील तीन टक्के व्याज केंद्र सरकार देणार आहे. थोडक्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यास केवळ चार टक्केच व्याज पडणार आहे.
मात्र, जिल्हा बँकेमार्फत राबविल्या जात असलेल्या या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे गायी नाहीत त्यांनाही कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बँकेचे संचालक उदय शेळके यांच्याकडे अशा तक्रारी आल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची चौकशी करण्याची सूचना केली आहे.
१४४ कोटींचे वाटप
जिल्हा बँकेने या योजनेत आतापर्यंत २९ हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक एस.जी. वर्पे यांनी ‘लोकमत’ला दिली. गायी नसताना कर्ज वाटप झाले असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क साधला असता नियमबाह्य कर्ज वाटप झाले असेल, तर चौकशी करू, असे तेही म्हणाले.
कर्ज वाटपाचे फोटो सेशन
शेतकऱ्यांना कर्ज देताना मोठे कार्यक्रम घेण्याचा धडाका काही संचालकांनी लावला आहे. कर्ज हे अनुदान नसून, ते शेतकऱ्यांना पुन्हा भरावे लागणार आहे. असे असतानाही या कर्ज वाटपाचे फोटो सेशन करून काही संचालक राजकीय फायदा उचलत आहेत. या कर्ज वितरणावरून बँकेत तीव्र मतभेद दिसत आहेत. प्रशासन काही संचालकांच्या दबावातून नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.
गायी नसताना कर्ज वाटप केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. असे असेल तर हे नियमबाह्य कर्ज ठरेल. यामुळे खरे गरजवंत शेतकरी वंचित तर राहतीलच; पण हे कर्ज बुडाल्यास त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या ठेवींवर होईल. त्यामुळे या सर्व कर्जवाटपाची चौकशी व्हावी ही आपली भूमिका असून, यासंदर्भात आपण सोमवारी बँकेला लेखी पत्र देणार आहोत.
-उदय शेळके, संचालक, जिल्हा सहकारी बँक