महिला बचतगटांना एक कोटीपर्यंत कर्ज
By Admin | Published: September 6, 2014 11:54 PM2014-09-06T23:54:45+5:302023-06-27T12:35:41+5:30
बचत गटांना भांडवल उभे करून देवू, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़
बाभळेश्वर : बचतगटांच्या चळवळीला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम जनसेवा फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून होत असल्याबद्दल कौतूक करताना महिलांमध्ये कष्ट करण्याची तयारी आहे़ परंतु भांडवल नाही़ भांडवलाची जबाबदारी आता जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून घेणार असून व्यवसायासाठी पुढे येणाऱ्या बचत गटांना एक कोटी रूपयांपर्यंतचे भांडवल उभे करून देवू, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़
लोणी येथील जनसेवा फौंडेशन, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ़ धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी शालिनीताई विखे होत्या़ सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, जि़ प़ सदस्या कांचन मांढरे, पुष्पा रोहम, पं़ स़ सदस्या पुष्पाताई आहेर, सुरेखा इनामके, बेबीताई आगलावे, पोपट वाणी, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सुमन वाबळे, आत्माचे संभाजी गायकवाड, डी़आऱडी़ए़चे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे, वैशाली कुकडे, लोंढे आदी उपस्थित होते़
प्रारंभी वर्धा येथील महात्मा गांधी औद्योगिक संस्थेचे निर्देशक डॉ़ प्रफुल्ल काले यांनी पावर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे महिलांना विविध व्यावसायाबाबत मार्गदर्शन केले़ पुढे बोलताना कृषिमंत्री विखे म्हणाले की, महिलांनी आता लोणचे, पापड या पारंपरिक व्यावसायाच्या पलिकडे जाऊन वेगळे करण्याची आवश्यकता असून रोजी दहा टन डाळिंबावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प खडकेवाके येथे सुरू करता येऊ शकतो़ बचत गटातील महिलांनी पुढे आले तर अणारदाणे तयार करण्यासारखे मोठे काम मिळू शकते़
सुजाता थेटे यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ प्रवरा परिसरातील सुमारे दिडशे गावातील महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या़
प्रारंभी हरिभाऊ आहेर यांनी प्रास्ताविक केले़ अंकुश माने, सुधाकर बोराळे, खालकर, प्रभावती मागल, अलकनंदा जोगळेकर आदी यावेळी उपस्थित होत्या़ कांतादेवी आहेर यांनी आभार मानले़
(वार्ताहर)