शेतक-यांच्या दोन लाखांवरील कर्जाचा विचार लवकरच : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:44 AM2020-01-12T11:44:42+5:302020-01-12T11:45:48+5:30
दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतक-यांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतक-यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करीत असताना एकाही शेतक-याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. त्याचबरोबर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतक-यांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले, अजून शेतकºयांचे अनेक प्रश्न शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतक-यांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरीत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल. दुधाच्या व्यवसायातही खूप अडीअडचणी असून कष्टही आहेत. या देशात अन्नधान्य परदेशातून आणावे लागत होते. आज हा देश अन्नधान्याच्या बाबतीच स्वयंपूर्ण बनला आहे, असेही थोरात म्हणाले.