नगर तालुका, एमआयडीसीमध्ये लॉकडाऊन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:57+5:302021-05-05T04:33:57+5:30
निंबळक : नगर शहराबरोबर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शहरात ज्या पद्धतीने कडक ...
निंबळक : नगर शहराबरोबर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शहरात ज्या पद्धतीने कडक लॉकडाऊन केला, तसाच लॉकडाऊन नगर तालुका व एमआयडीसीमध्ये करावा, अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना दिले आहे.
शहराप्रमाणेच नगर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये माहिती घेतल्यानंतर शासकीय नोंदीव्यतिरिक्त बाधित रुग्ण कित्येक पटीने जास्त आहेत. निव्वळ मोठ्या गावांचा विचार केला तरी त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुग्णसंख्येची सरासरी आढळते. यातील अनेकांची तपासणी होत नाही. लक्षणे असून असे रुग्ण फिरताना दिसतात. सर्व गावांमध्ये काही अपवाद वगळता पुढील अडचणी प्रकर्षाने आढळतात. गाव पातळीवर समित्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. तपासणी प्रक्रिया थंडावली. नागरिक सूचनांचे पालन करत नाहीत. क्वारंटाईन होणे टाळले जाते. अपवाद वगळता अनेक तलाठी सहकार्य करत नाहीत. आरोग्य कर्मचारी कमी संख्येने असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. एमआयडीसी परिसरात भरणारा बाजार डोकेदुखी ठरत आहे. बाजारामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांमध्ये शहर व तालुक्यातून येणारे हजारो कामगार एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अनेक कुटुंबेच बाधित होत आहेत. तालुक्यातील मृतांची संख्यासुद्धा अधिकृत संख्येपेक्षा जास्त आहे. ही बाब अत्यंत गंभीर होऊ नये, यासाठी शहराप्रमाणेच नगर तालुका व एमआयडीसीमध्ये कडक लाॅकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.