लॉकडाऊनमुळे मे महिन्यातील विवाह मुहूर्तही हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:14 PM2020-05-11T12:14:40+5:302020-05-11T12:17:28+5:30
लग्नासाठी अनेकांनी यंदाचा मुहूर्त काढला होता़ परंतु, लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील मुहूर्त हुकलेच आहेत. मे महिन्यात काही मुहूर्त आहेत. केंद्र सरकारने ५० नातेवाईकांसह लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. पण, जिल्हा प्रशासनाने तसा आदेश न काढल्याने मे महिन्यातील मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.
अहमदनगर : लग्नासाठी अनेकांनी यंदाचा मुहूर्त काढला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील मुहूर्त हुकलेच आहेत. मे महिन्यात काही मुहूर्त आहेत. केंद्र सरकारने ५० नातेवाईकांसह लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. पण, जिल्हा प्रशासनाने तसा आदेश न काढल्याने मे महिन्यातील मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.
मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराई असते. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात लग्नसमारंभ नियोजित तारखेला पारही पडले. परंतु, मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यातच कोरोनाने कहर केला आणि सर्व काही बंद करण्याची वेळ आली.
एप्रिल पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेला. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आला. त्यात केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ५० नातेवाईकांमध्ये लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली. परंतु, या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा अधिकार जिल्हाधिका-यांना आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही.
लग्नसमारंभाबाबत काय धोरण आहे, याची विचारणा अनेकजण करू लागले आहेत. मे महिन्याचा पहिला आठवडा तर संपलाच आहे. पण यानंतरच्या मुहूर्तावर काही लग्न करण्याचे योजिले आहे. पण प्रशासनाकडून कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक मंगल कार्यालय चालकांना पैसे परत करावे लागले. मे महिन्यातील पुढील तारखांचीही त्यांच्याकडे बुकिंग आहे. त्यांच्याकडे विचारणा होऊ लागली आहे़ परवानगी मिळत नसेल तर बुकिंगची रक्कम परत करा, अशी मागणी वधू पित्याकडून केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम परत करावी की नाही, असा पेच मंगल कार्यालय चालकांसमोर आहे. मंगलकार्यालय असोसिएशनकडून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केली आहे.
साध्या पद्धतीने लग्न करण्यास नातेवाईक तयार
सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन केल्यामुळे एप्रिल व मे महिन्यातील जे विवाह नियोजित करण्यात आले होते, ते पूर्णपणे स्थगित केलेले आहेत. आता केंद्र सरकारने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वर-वधू साध्या पद्धतीने लग्न करण्यास तयार आहेत. जेवणावळी, वरात असे कोणतेही कार्यक्रम न करता फक्त विधी करण्याचे नियोजन आहे. तसेच मंगल कार्यालयांकडून मास्क सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दोन महिने गेले आहेत़ एक महिना बाकी आहे. महिन्यातील लग्नसमारंभाबाबतचे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशी मागणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर यांनी केली आहे.