अहमदनगर झेडपीच्या ४९ शाळांना कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:53 PM2017-12-02T12:53:30+5:302017-12-02T12:56:05+5:30
जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़
राज्यातील १ हजार ३०० जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ पटसंख्येअभावी बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील ४९ शाळांचा समावेश आहे़ बंद पाकिटातून हा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला़ शिक्षण विभागाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे़ संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाºयांना बंद करण्यात येणाºया शाळांची नावे कळविण्यात आली असून, या सदर शाळा तत्काळ बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून या शाळांना कायमचेच कुलूप लावण्यात आले असून, मुलांना इतर शाळांत पाठविण्यात आले आहे़ मागील शैक्षणिक वर्षांत दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळांची संख्या ८९ होती़
चालू वर्षातील वर्गनिहाय पटसंख्या जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे़ तसे पत्र शिक्षण विभागाने शाळांना दिले आहे़ पटसंख्येची माहिती अजून जिल्हा परिषदेलाच मिळालेली नाही़ असे असताना शिक्षण विभागाने कुठल्या आकडेवारीनुसार शाळा बंद केल्या, पटसंख्या हा एकमेव निकष
लावण्यात आला की आणखी काही निकष आहेत, याबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अनभिज्ञ आहे़
जिल्हा परिषद शाळांची सर्व माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे़ त्याआधारे ही कारवाई करण्यात आली असावी, असे काहींचे मत आहे़ शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाचा आढावा घेतला होता.
अकोले तालुक्यातील सर्वाधिक १४ शाळा शिक्षण विभागाच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत़ कर्जत तालुक्यातील ९ तर संगमनेरमधील ६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ उर्वरित शाळा जामखेड, नगर, पारनेर, पाथर्डी, राहाता, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यातील आहेत़