आटलेला तलाव : भीषण दुष्काळामुळे भुतवडा तलाव कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:53 AM2019-05-07T10:53:11+5:302019-05-07T10:58:33+5:30
शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे.
अशोक निमोणकर
जामखेड : शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे. त्यामुळे शहराला टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचा वेळ आली आहे.
या तलावातून ग्रॅव्हिटीने (वीजपुरवठा अभावी थेट) पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी राज्यातील दुसरी योजना आहे. तलाव कोरडाठाक पडल्यामुळे गाळ काढण्याचा प्रयत्न दोन वेळा केला गेला. यावेळी मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहराच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी १९ आॅक्टोबर १९७० साली विंचरणा नदीवर भुतवडा तलाव बांधण्यास सुरुवात झाली. या तलावात सौताडा, मुगगाव, भवरवाडी येथील पडणारे पावसाचे पाणी येईल, अशा दृष्टीने नियोजन केले होते. ३०५ मीटर लांब, २५० मीटर रूंद, ३० मीटर खोल व ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणाºया तलावाचे काम सुरू झाले. या तलावातून जामखेड शहर, आसपासच्या लेहनवाडी, रेडेवाडी, हापटेवाडी व भुतवडा गाव यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा व ७३४ हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येईल अशा नियोजनातून १०.८० कि. मी. लांबीचा कालवा काढण्यात आला. १९७८ साली या तलावाचे काम पूर्ण झाले. तलाव पूर्ण क्षमतेने भरून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता.
या तलावामुळे जामखेड शहर व चार वाड्यावस्त्यासाठी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने जामखेड शहराबाहेर व शहरात असलेला नोकरीला असणारा वर्ग जामखेड येथे स्थिरावू लागला. चार जिल्ह्याच्या सीमेवर जामखेड शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व पिण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने व्यापार वाढू लागला. भुतवडा तलाव उंचीवर असल्याने ग्रॅव्हिटीने थेट पाणीपुरवठा पूर्ण दाबाने येत असल्याने १५ ते २० मीटर नळाने पाणी मिळत असे. दिवसातून दोन वेळा पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असे. त्यामुळे साहजिकच भुतवडा तलाव जामखेड शहरासाठी वरदान ठरला आहे . यामुळे कोणीही जामखेडला राहण्यासाठी पसंती देत होते. सन १९९५ पासून शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता दोन वेळ होणारा पाणीपुरवठा एकवेळ तर शेतीला कालव्याद्वारे येणारे पाणी कमी झाले. तरीही शहराचा विस्तार चार ते कि. मी.पर्यंत वाढतच गेला.
परंतु तलाव ते जलशुद्धीकरण जलवाहिनी व शहरातील पाणीपुरवठा करणारी योजना अद्याप तीच असून ती जीर्ण झाली आहे.
पंधरा हजार लोकसंख्या व शेतीला पाणीपुरवठा या हेतूने निर्माण झालेल्या तलावाला २५ वर्षानंतर ग्रहण लागण्यास सुरवात झाली. २००३ साली अल्प पाऊस झाला. यामुळे तलावात थोडेफार पाणी आले.
शेती व पिण्याच्या पाण्यामुळे तलाव २००३ ला डिसेंबर अखेर कोरडाठाक पडला. या कोरडाठाक पडलेल्या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती. त्यावेळी गाळ काढण्याचे थोडेफार प्रयत्न झाले. त्यानंतर २००८, २०१४, २०१६ तलाव कोरडाठाक पडला होता. मात्र २०१६ साली माजी महसूल मंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नातून व जामखेड नागरिकांच्या वतीने तलावातून गाळ काढण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी मदत करून उत्स्फूर्तपणे तलावातील गाळ काढला गेला.
भुतवडा तलावातील गाळ लोक सहभागातून काढला गेला. परंतु अद्याप तलावातील गाळ काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
-रामभाऊ ढेपे, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग