गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे कोल्हार येथील तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:52 PM2017-12-15T16:52:13+5:302017-12-15T16:55:13+5:30
मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले़ संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
राहुरी : मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास नगर-मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
गेल्या आठवड्यात गावक-यांनी गाढवांच्या बंदोबस्तासाठी मोर्चा काढला होता. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे व मंडल अधिका-यांना लेखी निवेदनही दिले होते. शेतक-यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून बंदोबस्त करू, अशी ग्वाही महसूल विभागाने दिली होती. मात्र, गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे ही गाढवे शेतक-यांच्या शेतामध्ये चरत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कामगार तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले.
वाळूचा व्यवसाय करणारे वाळू वाहून झाल्यानंतर गाढवांना मोकाट सोडून देत आहेत. कोल्हार परिसरात असलेले ऊस, चारा व भाजीपाला पिकात शिरून गाढवांचा कळप शेतीची नासधूस करीत आहे. गाढवांच्या माध्यमातून वाळूचा उपसा होत असताना महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल शेतक-यांनी केला. काही गाढवे शेतकरी शरद शिरसाट यांनी शेतात पकडून ठेवली. शेतात गाढवांनी केलेले नुकसान पाहण्यासाठी कामगार तलाठी हरिश्चंद्रे मुठे यांनी यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतक-यांनी तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, सुरेश जाधव, श्रीधर शिरसाट, शरद शिरसाट, राजेंद्र भालेराव, गणेश राऊत, प्रभाकर शिरसाट, गणेश डोके, सचिन शिरसाट, नाना चिखले आदी शेतकरी उपस्थित होते.
कोल्हार खुर्द परिसरात गाढवांचा उपद्रव वाढला आहे. ५० गाढवं वारंवार शेतात शिरून पिकांची नासधूस करतात. महसूल विभागाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करू, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल.
-प्रकाश पाटील, सरपंच, कोल्हार खुर्द
गाढवांच्या मालकांना नोटीस काढण्यात आली आहे़ आम्ही व्यवसाय करणार नाही, असे लिहून घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करण्यात येईल. यापुढे शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी महसूल विभाग घेईल.
-अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी