लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 06:17 PM2020-04-09T18:17:09+5:302020-04-09T18:17:09+5:30
अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.
राजूर : मेहनत, मशागत आणि जिद्दीला योग्य व्यवस्थापनाची जोड देत युवा शेतक-याने काकडीची बाग फुलवली. त्याने केलेल्या कष्टाला फळही मिळाले.दिवसाआड तीन टनापर्यंत उत्पादनही सुरू झाले. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.
पारंपरिक शेतीला फाटा देत विठ्ठल चौधरी या तरुण शेतकऱ्याने कर्जाऊ रक्कम घेत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रात शेडनेट हाऊसची उभारणी केली. त्यात ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. पावसाळी हंगामात झेंडू घेत त्यांनी दमदार सुरुवात केली. तर उन्हाळी पिकाचे नियोजन करत शिमला मिरची आणि काकडीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यावर्षी काकडीचा बाग उभी करण्याचे ठरवले. नियोजनाप्रमाणे ४८ हजार रुपयांचे काकडीचे बी त्यांनी खरेदी केले. शेणखताचा वापर करत शेतीची मशागत केली. बेड तयार करत नवीन मल्चिंग पेपरचा वापर करत बियांचे रोपण केले. चोख व्यवस्थापनामुळे ३५ दिवसांत काकडीच्या बहरलेल्या वेलींना मोठ्या प्रमाणात काकड्या लगडल्या. या वर्षी कर्ज फिटणार असा आशावाद निर्माण झाला. पहिला तोडा सुरू होणार तोच लॉकडाऊन सुरु झाले. वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्याने मोठी समस्या त्यांना निर्माण झाली. बाजारपेठ सुरू झाली असली तरी फक्त साडेतीन टन माल व्यापारी घेत आहेत. उरलेला माल जनावरांना चारा म्हणून विठ्ठल चौधरी वापरु लागले.
चौदा लाख रुपये खर्च करून तीन वर्षापुर्वी एक एकर क्षेत्रात शेडनेट उभे केले. दहा लाख रुपये कर्जाऊ घेतले. आत्मविश्वासाने पारंपरिक शेतीला बाजूला करत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेती सुरू केली. पहिल्या वर्षी तीन लाख रुपयांचे खर्चासह उत्पन्न मिळाले. दुसरे वर्षी बाजार भाव कोसळले. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. उन्हाळ्यात काकडीचे नियोजन केले. नियोजनाप्रमाणे उत्पन्नही मिळू लागले. कोरोनामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली. काकड्या जनावरांसाठी वापरत आहे. – विठ्ठल चौधरी, शेतकरी