सातेवाडीच्या शाळेला पाच दिवसांपासून कुलूप : स्वातंत्र्यदिनी ध्वजावंदन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:30 PM2018-08-15T14:30:52+5:302018-08-15T14:31:14+5:30
अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रमही झाला नाही.
कोतूळ : अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रमही झाला नाही. हा कार्यक्रम शाळेत न घेता ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला. सध्या गावात तणावाचे वातावरण असून संस्था पदाधिकारी आल्याशिवाय टाळे उघडणार नाही या भुमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. मात्र पाच दिवसांपासून शाळा बंद असूनही एकही शिक्षण विभागाचा अधिकारी न आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातेवाडी येथेउज्वला एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे १७५ पटसंख्या असलेले न्यू इंग्लिश स्कूल ही दहावीपर्यंतची माध्यमिक शाळा आहे. तसेच या संस्थेचे कोतूळ व उल्हासनगर येथेही व्द्यिालय आहे. संस्थेचा सर्व कारभार मुंबईतूनच चालतो . गेल्या महिन्यात सातेवाडी येथील मुख्याध्यापिका चार दिवस आजारपणाच्या रजेवर असताना संस्थेने येथील दोन शिक्षकांच्या बदल्या कोतूळ येथे केल्या. त्याबदल्यात कोतूळ येथून दोन शिक्षक सातेवाडी येथे बदली दिले त्यात एक शिक्षिका सातेवाडी येथे हजर झाल्यावर तिस-या दिवशी सेवानिवृत्त झाल्या व दुसरे शिक्षक गणित विषयाचे नसताना सातेवाडी येथे दिले. त्यामुळे आता पाचवी ते दहावीपर्यंत या शाळेत केवळ पाच शिक्षक अध्यापन करत आहेत. त्यामध्ये गणित विषयाचा एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी व पालकांत संतापाची लाट उसळली. त्यामुळे गावाने एकत्र येऊन शनिवारपासून(११आॅगस्ट) शाळेला टाळे ठोकले.
दरम्यान आज स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण देखील शाळेत न करता सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालया समोरच ध्वजारोहण केले. येथील शिक्षकांना देखील शाळेत जाण्यास मज्जाव केला. चक्क पाच दिवस शाळा बंद असून तालुक्यातील शिक्षण विभागाने इकडे लक्ष न दिल्याने शिक्षण विभावर संशयाची सुई फिरत आहे .
मी घडलेला सर्व प्रकार संस्थेचे अध्यक्ष यांना पहिल्याच दिवशी कळवला आहे. ग्रामस्थ संस्था पदाधिकारी आल्याशिवाय शाळा उघडू देत नाहीत. मी गावक-यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. - प्रमिला सुर्वे, मुख्याध्यापिका
मला या बाबतीत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. असा प्रकार असेल तर चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. बदल्या कायदेशीर आहेत का याचीही चौकशी होईल. - अरविंद कुमावत, गटशिक्षणाधिकारी, अकोले,