Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून एकही महिला खासदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 04:02 PM2019-03-20T16:02:01+5:302019-03-20T16:11:57+5:30

संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़

Lok Sabha Election 2019: Ahmednagar ladies no chance from loksabha | Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून एकही महिला खासदार नाही

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून एकही महिला खासदार नाही

अण्णा नवथर
अहमदनगर : संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़ अहमदनगर लोकसभा निवडणूक मैदानात अभिनेत्री दीपाली सय्यद वगळता एकाही निवडणुकीत महिलांना मैदानात उतरविलेले नाही़ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा होती़ परंतु, त्यांचे नाव मागे पडले़ त्यामुळे यंदाही महिला खासदार होतील, याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रीय राजकारणात महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील नेते तोंड पाटीलकी करत असले तरी उमेदवारी वाटप करताना महिलांना संधी दिली गेली नाही़
अहमदनगर जिल्ह्यातील आजवरच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता सन १९५१ पासून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव राष्ट्रवादीकडून मध्यंतरी पुढे आले होते़ परंतु, हे नावही आता मागे पडले आहे़ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महिलांना स्थान मिळेल, असे वाटत नाही़
अहमदनगर लोकसभा आणि पूर्वीच्या नगर दक्षिण मतदारसंघातून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ अहमदनगर जिल्ह्याने राज्याला अनेक बडे नेते दिले़
जिल्ह्यात विखे, गडाख, जगताप, नागवडे, राजळे, ढाकणे, काळे, कोल्हे, घुले यासारखी प्रमुख राजकीय घराणी आहेत़ त्यांच्याभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरते़ यापैकी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत़ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत़
शेवगाव- पाथर्डीच्या जनतेने मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठविले़ आमदार स्नेहलता कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ याशिवाय महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींत महिलांना संधी दिली गेली़ पण संसदीय राजकारणातून महिलांना डावलले गेले़ या मतदारसंघात नेहमीच साखर सम्राटांचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र, महिला उमेदवारांना अद्याप एकाही पक्षाकडून तिकीट दिले गेलेले नाही़

८ लाख ७१ हजार महिला मतदार
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ३१ हजार आहेत़ यापैकी ८ लाख ७१ हजार महिला मतदार आहेत़ महिलांची मते मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, या मतदारसंघातून महिलांना उमेदवारी दिली गेली नसल्याचे दिसते़

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Ahmednagar ladies no chance from loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.