Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये मतदारांवर कुणाची मात्रा; ‘आयुर्वेद’ की ‘अ‍ॅलोपॅथी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:39 PM2019-03-22T12:39:46+5:302019-03-22T12:41:46+5:30

राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे

Lok Sabha Election 2019: Ahmednagar lok sabha election, sujay vikhe and sangram jagtap | Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये मतदारांवर कुणाची मात्रा; ‘आयुर्वेद’ की ‘अ‍ॅलोपॅथी’?

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये मतदारांवर कुणाची मात्रा; ‘आयुर्वेद’ की ‘अ‍ॅलोपॅथी’?

अण्णा नवथर
अहमदनगर : राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यात संग्राम यांचे वडील आमदार अरुण जगतापही आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांवर कुणाची मात्रा लागू होणार ‘आयुर्वेद की अ‍ॅलोपॅथी’ याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप विरुध्द डॉ. सुजय विखे अशी सरळ लढत होत असली तरी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचीच ही लढाई आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याच्याच नव्हे, तर देशातील नेत्यांचे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांनी तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार दिले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय डॉक्टर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे पुत्र संंग्राम विद्यमान आमदार आहेत. त्यांचे शिक्षण बी.कॉम. आहे.  या दोन्ही उमेदवारांच्या पदव्या पाहता ते उच्च शिक्षित आहेत. एक डॉक्टर आहे, तर दुसऱ्याने वाणिज्यमध्ये पदवी मिळविलेली आहे. डॉ. सुजय विखे यांनी मतदारसंघात अनेक आरोग्य शिबीर घेऊन मतदारांवर उपचार केलेले आहेत. हाच मुद्दा विखे प्रचारात वारंवार सांगत आहेत. त्याआधारे ते मते मागत आहेत. विखे उच्च शिक्षित आणि तरुण असल्यानेच राष्ट्रवादीनेही तरुण उमेदवाराची निवड केली आहे. डॉक्टर असलेल्या विखे यांनी मतदारसंघात अनेक राजकीय सर्जरी केल्याची चर्चा आहे़ परंतु, मतांची गोळाबेरीज करण्यात संग्राम जगताप चांगलेच पारंगत आहेत़ ते गेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसले आहे़ मतांची जुळवाजुळव कशी करायची आणि जादुई आकडा कसा गाठायचा, यात त्यांचा हातखंडा आहे. पण, विखे यांनी गेल्या तीन वर्षात अनेक सर्जरी मतदारसंघात केल्या आहेत. विखे यांनी एकदा सर्जरी केली की पुन्हा दुखणे डोके वर काढत नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे.
‘विखे बाहेरचे उमेदवार आहेत’, अशी टीका जगताप यांच्याकडून होऊ लागली आहे. ‘घरचा खासदार, नगरचा खासदार’, अशा पोस्ट सध्या राष्ट्रवादीकडून व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनाही इलाज करावे लागतील. नगर शहरातील मतांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. संग्राम जगताप शहराचे आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची गोळाबेरीज नगर शहरापासूनच सुरू होते. पण, विखे उत्तरेतील असल्याने त्यांना सुरुवात कुठून करावी आणि कुठे संपवावी, असा पेच त्यांच्या समोर आहे. त्यामुळेच ते सकाळी पाथर्डीत तर दुपारी कर्जत- जामखेडमध्ये असतात़ त्यांचे वडील श्रीगोंद्यात असतात. त्यांना एकूणच कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सर्जरी करत फिरावे लागणार असल्याचे दिसते. आमदार जगताप यांचे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेडमध्ये नातेवाईक आहेत.  त्यामुळे तिथे त्यांना गोळाबेरीज करावी लागणार आहे. इकडे शेवगावमध्ये घुले बंधुही लिड कितीचा देणार, याचा आकडा त्यांनीच आधीच सांगून टाकला आहे. त्यामुुळे मतदारांवर कोणाची मात्रा चालली, हे २३ मे रोजीच स्पष्ट होईल.

Web Title: Lok Sabha Election 2019: Ahmednagar lok sabha election, sujay vikhe and sangram jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.