Lok Sabha Election 2019 : कांबळे यांच्या उमेदवारीमुळे विखेंची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:49 PM2019-03-20T12:49:11+5:302019-03-20T13:12:53+5:30
शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. बरोबरीनेच जिल्हाध्यक्षपदी युवा नेते करण ससाणे यांची वर्णी लावली.
शिवाजी पवार
श्रीरामपूर : शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. बरोबरीनेच जिल्हाध्यक्षपदी युवा नेते करण ससाणे यांची वर्णी लावली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या दोन्ही शिलेदारांना ताकद देऊन पक्षाने विखे यांची पक्षांतर्गत कोंडी केल्याचे बोलले जात आहे. कांबळे उत्तरेत तर ससाणे दक्षिणेतून विखे यांना खिंडीत पकडणार आहेत.
आमदार कांबळे यांनी विखे यांची दोनच दिवसांपूर्वी समर्थकांसमवेत भेट घेतली होती. भाजपत प्रवेश करत नगरमधून उमेदवारीवर दावेदारी केल्याने डॉ.सुजय विखे हे शिर्डीतून शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मातोश्रीवर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना तसा शब्द दिला आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांना आमदार कांबळेंना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. अशातच विखे यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय भूकंप घडला आहे.
शिर्डी मतदारसंघात आमदार कांबळे यांचे नाव उमेदवारीसाठी सुरवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र, सुजय यांच्या पक्षांतरामुळे ते उमेदवारी करणार की माघार घेणार ही उत्सुकता होती. अखेर बंडाचे निशाण फडकवित कांबळे उमेदवारीसाठी सरसावले आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या मागे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेच असल्याचे समजते. ससाणे व कांबळे हे दोघेही आपापल्या रितीने थोरात यांच्या संपर्कात होते. कांबळे यांची उमेदवारी ही विखेंसाठी धक्का मानली जात आहे. विखे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या चर्चेला उधान आले आहे. त्यांनी पक्षांतर केल्यास कांबळे हेदेखील त्यांच्या समवेत कमळ हाती घेतील असा राजकीय कयास होता. मात्र, कांबळेंनाच रिंगणात उतरवत ही शक्यता काँग्रेस पक्षाने आता संपुष्टात आणली आहे.
दुसरीकडे कमी वयात ससाणे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्रीरामपुरातून काँग्रेस पक्षाला विधानसभेत चार वेळा विजय मिळवून देणाऱ्या दिवंगत जयंत ससाणे यांच्याच पक्षनिष्ठेला ही पावती मानली जात आहे. करण हे युवक काँग्रेसचे महासचिव देखील आहेत.
या निवडीमुळे ससाणे यांच्यावर ऐन निवडणुकीच्या काळात जिल्हा काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरमधून डॉ.सुजय यांच्या विरोधात ते प्रचार करणार का हे आता पहावे लागेल. आमदार कांबळे व ससाणे यांच्यात मोठे राजकीय वैैमनस्य आहे. दोघांच्या समर्थकांत हाणामारीचे प्रसंग उदभवले आहेत. मात्र, एकाच रात्रीतून दोघांवरही काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोघांमधील राजकीय कटूता दूर करत मनोमिलन घडवून आणल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींमागे माजी मंत्री थोरात व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची व्यूहनिती असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.