Lok Sabha Election 2019 : शिर्डीत वंचित आघाडीने बदलला उमेदवार : संजय सुखदान रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:52 PM2019-04-09T12:52:25+5:302019-04-09T12:52:29+5:30
वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघातील उमेदवार डॉ.अरुण साबळे यांची उमेदवारी अचानक रद्द केली आहे.
श्रीरामपूर : वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघातील उमेदवार डॉ.अरुण साबळे यांची उमेदवारी अचानक रद्द केली आहे. या जागी नेवासे येथील आंबेडकरी चळवळीतील नेते व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय सुखदान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आघाडीने येथे डॉ.साबळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिर्डीत सर्वप्रथम आघाडीनेच आपला उमेदवार घोषित केला होता. डॉ.साबळे हे शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वैैद्यकीय अधीक्षक होते. ते राहाता येथे व्यवसाय पाहत होते. अकोले, संगमनेर येथे त्यांनी काही काळ नोकरी केली.
दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे डॉ.साबळे यांना आपली उमेदवारी गमवावी लागली आहे. त्यांनी यापूर्वी सरकारकडे पूर्ववत पदावर रुजू होण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारकडून नुकतीच कार्यवाही करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी ही बाब माहीत नव्हती. आता उशिराने हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तांत्रिक अडचण लक्षात घेऊन नाईलाजास्तव उमेदवार बदलावा लागत असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.जालिंदर घिगे यांनी दिली.
नेवासे येथील सुखदान हे गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मंगळवारी दुपारी सुखदान हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पी.डी.सावंत, किसन चव्हाण, किरण साळवी आदी उपस्थित राहणार आहेत.