Lok Sabha Election 2019 : शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:15 PM2019-04-05T12:15:16+5:302019-04-05T12:21:57+5:30
आचारसंहितेचे उल्लंघन करीत विनापरवाना सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
घारगाव : आचारसंहितेचे उल्लंघन करीत विनापरवाना सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पांडुरंग नामदेव वाकचौरे (वय ५६, शाखा अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोले) यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे गुरूवारी सकाळी खासदार लोखंडे यांनी निवडणूक आयोगाची परवानगी न घेता प्रचार सभा घेतली. यावेळी विनापरवाना लाऊडस्पिकर लावत जनसमुदाय जमविण्यात आला. आचारसंहितेचा भंग केल्याने अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये तक्रार दाखल केली आहे.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. अकलापूर येथे एका कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्याने त्यानेच मंडप उभारला होता. तेथे जात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मीच आहे. परंतु अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नसून प्रचाराचा प्रश्न उरत नाही. त्यामुळे माझ्याकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही. - सदाशिव लोखंडे, खासदार