Lok Sabha Election 2019 : मित्र पक्षांच्या गोटात काय चाललंय? : गटबाजी संपल्याने काँग्रेसमध्ये ‘जोर लगा के’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:38 PM2019-04-11T12:38:07+5:302019-04-19T15:52:13+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखेंचे बंड झाले आहे.
अण्णा नवथर
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखेंचे बंड झाले आहे. विखे गट काँग्रेसमधून बाहेर पडल्याने बाळासाहेब थोरात यांच्या गटातील सर्व कार्यकर्ते राष्टÑवादीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावले आहे.
अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस- राष्ट्रवादीत टोकाचा संघर्ष झाला़ परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढविण्यावर ठाम राहिली़ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली़ डॉ़ सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच विखे व थोरात असे दोन गट आहेत़ विखेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमधील गटबाजीचा शेवट झाला अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. आता शतप्रतिशत बाळासाहेब थोरात यांचेच नेतृत्व राहील. त्यामुळे संघटना बांधणीला मदत होईल, अशी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांची भावना आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षात नेहमीच दबून राहिलेल्या कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने ते उत्साहाने निवडणुकीला सामोरे जात आहेत़
थोरात गटाचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून पळत आहेत़ जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याची संधी थोरात यांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. सत्यजित तांबे यांनी गत विधानसभेला नगरमधून सुमारे २५ हजार मते घेतली होती. ही सर्व ताकद ते राष्टÑवादीच्या पाठिशी उभी करतील.
पारनेर : पारनेर तालुक्यातील विखे समर्थक युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरलेले आहेत़ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणारे ज्ञानदेव वाफारे, ज्ञानदेव बाबर, गंगाराम बेलकर हे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करत आहेत़ राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात अधिक असून, त्यांच्या जोडीला काँग्रेसचे नेतेही आहेत़
श्रीगोंदा : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा तालुक्यातील आहेत़ ते विखे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आहे़ माजीमंत्री थोरात यांच्या समर्थक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, त्यांचे पती राजेंद्र नागवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रशांत दरेकर हे संग्राम यांच्या प्रचारात सक्रीय आहेत.
नगर शहर : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे पाच नगरसेवक आहेत़ त्यापैकी दोन नगरसेवक विखे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत़ उर्वरित नगरसेवक काँग्रेससोबतच असून, ते आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करत आहेत़ काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुखही आघाडीसोबत आहेत़
कर्जत- जामखेड : जामखेड तालुक्यातील थोरात गटाचे बाळासाहेब साळुंके, जमिर सय्यद, रमेश अजबे आघाडीसोबत आहेत़ कर्जत तालुक्यातील शहाजीराजे भोसले, प्रवीण घुले, अॅड़ शेवाळे हे आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागले आहेत़
शेवगाव- पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे़ शेवगाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे़ या दोन्ही तालुक्यातील विखे समर्थक भाजपच्या उमेदवाराचे काम करत आहेत़ विखे यांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे राष्ट्रवादीत आलेल्या आहेत़ त्यामुळे शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे़
नगर- राहुरी : नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, रावसाहेब शेळके, ज्ञानदेव दळवी, संपतराव म्हस्के, जयंत वाघ हे काँग्रेससोबत असून, ते आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत़ राहुरी तालुक्यात जयंत कुलकर्णी, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब चव्हाण, बाबासाहेब धोंडे आघाडीसाठी काम करत आहेत़
सर्व मित्रपक्ष, विविध संघटनांचा प्रचारात सहभाग
उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत असलो तरी मित्र पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, दलित महासंघ या प्रमुख पक्षांसह शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत़ सर्वच तालुक्यांतील राष्ट्रवादी व मित्र पक्ष काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़
- संग्राम जगताप, उमेदवार, महाआघाडी, अहमदनगर लोकसभा