Lok Sabha Election 2019 : गांधी दिल्लीत, विखे मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:02 PM2019-03-16T16:02:29+5:302019-03-16T16:17:13+5:30
भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत़ शुक्रवारी त्यांनी कोअर कमिटीची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली,
अहमदनगर : भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत़ शुक्रवारी त्यांनी कोअर कमिटीची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली, तर डॉ़ सुजय विखे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली़ त्यामुळे खासदार दिलीप गांधी व विखे यांच्यात तिकिटासाठी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत़
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी उमेदवारीचे दावेदार आहेत़ परंतु, काँग्रेसचे डॉ़ विखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला़ विखे यांच्या भाजपप्रवेशाचे गांधी यांनी स्वागत केले असले तरी ते उमेदवारी करण्यावर ठाम आहेत़ भाजपची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार आहे़
ही यादी जाहीर होण्यापूर्वीच गांधी दिल्लीला रवाना झाले़ ते दिल्लीला रवाना झाल्यानंतर सायंकाळी जैन समाजाने नगरमध्ये बैठक घेऊन गांधी यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा वेगळा विचार करू, असा पवित्रा घेतला़ गांधी यांच्या उमेदवारीसाठी भाजपवर दबाव वाढत असून, गांधी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत़ त्यांनी भाजपाच्या दिल्लीतील कोअर कमिटीचे सदस्य नितीन गडकरी व सुषमा स्वराज यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ गांधी यांनी दिल्लीत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने डॉ़ विखे यांनीही मुंबईत पालकमंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, महादेव जानकर या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
भाजपच्या पहिल्याच यादीत नाव यावे यासाठी विखे यांचा प्रयत्न आहे़ परंतु, गांधी यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे विखे यांचे नाव पहिल्या यादीत झळकणार की नाही, याबाबत साशंकता आहे़