Lok Sabha Election 2019: गांधींना उमेदवारी नाकारल्यास वेगळा विचार करणार; जैन समाजाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:47 AM2019-03-15T05:47:52+5:302019-03-15T05:48:35+5:30
सुजय विखे यांच्या उमेदवारीला विरोध
अहमदनगर : ज्या व्यक्तीने भाजप पक्षवाढीसाठी हयात घालवली त्यांना डावलून केवळ पैशाच्या जोरावर आयात लोकांना उमेदवारी मिळत असेल, तर याचा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फेरविचार करावा व नगरमध्ये दिलीप गांधी यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जैन समाजाने केली आहे.
पत्रकार परिषदेत जैन समाजाने आपली भूमिका मांडली. गांधी हे जैन समाजाचे एकमेव खासदार आहेत. त्यांचा असलेला मोठा लोकसंपर्क व केलेली व्यापक कामे यामुळे आतापर्यंत ते तीन वेळा खासदार राहिले. त्यांना मंत्रिपदही मिळाले. २००४ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरी त्यांनी एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले. अशा प्रामाणिक उमेदवारांना डावलले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
एकवेळ पक्षातील दुसऱ्या निष्ठावंताला उमेदवारी मिळाली असती तर समजण्यासारखे होते. मात्र, सकाळ, दुपार, संध्याकाळ पक्ष बदलणाऱ्यांना भाजपने केवळ पैसा आहे म्हणून पक्षात घेतले. त्यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. जैन समाज अशा आयात उमेदवारांना थारा देणार नाही, अशी टीका सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावर करण्यात आली. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत, अशोक कटारिया, जवाहर मुथा, रमेश फिरोदिया, अशोक बोरा, शैलेश मुनोत, सुभाष मुथा,अजय बोरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्टÑवादीत सस्पेन्स कायम नगरमधून राष्टÑवादीने उमेदवारीसाठी आमदार अरुण जगताप यांचे नाव अंतिम केल्याचे समजते. मात्र, पहिल्या यादीत पक्षाने ही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे.
कॉंग्रेस निरीक्षकांची नगरमध्ये बैठक
कॉंग्रेसचे सचिव मानसी रेड्डी यांनी बुधवार व गुरुवार नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या. या बैठकीत त्यांनी कॉंग्रेसचा आढावा घेतला आहे. सुजय विखे यांच्या पक्षांतरामुळे कॉंग्रेसचे कोणते पदाधिकारी त्यांच्यासोबत जातील याचा त्यांनी आढावा घेतल्याचे समजते. कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यात काही संघटनात्मक बदल होण्याचे संकेतही यातून मिळत आहेत.