Lok Sabha Election 2019 : ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : रोजगाराला देसावर; रेशनला डोंगरावर

By सुधीर लंके | Published: April 8, 2019 10:44 AM2019-04-08T10:44:50+5:302019-04-08T10:47:04+5:30

फोफसंडी दररोज पहाटे तीन वाजता जागी होते अन् रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात देसावर धावते.

Lok Sabha Election 2019: Ground Report of Lokmat: Rosgarala Desauer; Rational Mountain | Lok Sabha Election 2019 : ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : रोजगाराला देसावर; रेशनला डोंगरावर

Lok Sabha Election 2019 : ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : रोजगाराला देसावर; रेशनला डोंगरावर

सुधीर लंके
अहमदनगर : फोफसंडी दररोज पहाटे तीन वाजता जागी होते अन् रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात देसावर धावते. रेशनच्या आॅनलाईन थम्बसाठीही या गावात रेंज नाही. डोंगर चढून बारा किलोमीटरवर जायचे अन् थम्ब आणायचा. रेंजप्रमाणे या गावाला लोकप्रतिनिधींचेही दर्शन घडत नाही. ऐन निवडणुकीतही फोफसंडी देसावर आहे. डिजिटल इंडियाची ही नॉटरिचेबल कहाणी फोफसंडीत पहायला मिळाली.
निवडणुकीचा माहोल पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट फोफसंडीपासून आपला दौरा सुरु केला. फोफसंडी हे नगर जिल्ह्यातील एकदम तळातील गाव. नगर, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर. आदिवासी गाव. अकोले या तालुक्याच्या ठिकाणापासून ४४ किलोमीटवर. या गावात अद्यापही मोबाईल व बीएसएनएलची रेंज नाही. शासनाने एक सॅटेलाईट फोन बसविला होता. पण, तो बंद पडला. आता चार किलोमीटरवर डोंगर चढून जावे लागते. तेव्हा रेंज मिळते. हा डोंगर म्हणजे या गावाचा जगाशी संपर्काचा टॉवर.
फोफसंडीतील मंदिरासमोर पाण्याची टाकी आहे. तिच्यात पाणी मात्र नाही. बायका दूर रानातून डोक्यावर हंडे घेऊन येताना दिसत होत्या. भीवा वळे यांच्या ओट्यावर म्हातारी माणसे बसली होती. तेथेच गप्पांचा फड सुरु केला. गावातील बहुतांश घरांना कुलपे दिसली. चौकशी केली असता समजले की, हे गाव दररोज पहाटे तीन वाजता उठते. बायका पहाटेच स्वयंपाक करतात. सहाच्या ठोक्याला मालवाहू पिकअपमधून ही माणसे पुणे जिल्ह्यात ओतूर परिसरात रोजगारासाठी जातात. ओतूर पट्ट्यात (या भागात गेले म्हणजे ‘देसावर’ जाणे असे म्हणतात.) मजुरांचा बाजारच भरतो. तेथे बागायतदार लोक येऊन या मजुरांना दिवसभरासाठी कामाला घेऊन जातात. रात्री सात-आठ वाजता पुन्हा गावात परतायचे. म्हातारी माणसे सांगत होती, गावात पिण्याचेच पाणी नाही तेव्हा शेतीला कोठून मिळणार? पावसावरची पिके. तीही डुकरे उद्धस्त करतात. रोजगार हमीचीही कामे नाहीत. त्यामुळे देसावर जाण्याशिवाय पर्याय नाही.
खासदार कोण आहे? हा प्रश्न केला तर सगळी माणसे एकमेकाकडे पहायला लागली. ‘खासदार काळा की गोरा आम्ही पाहिला नाही’, असे ती सांगत होती. सध्या उमेदवार कोण आहे ? या प्रश्नावरही ‘अजून आमच्याकडे कोणीच फिरकले नाही. तेव्हा काहीच ठाऊक नाही’, असे त्यांचे उत्तर होते. ‘निवडणूक आली की मत मागण्यासाठी सगळ्यांच्या गाड्या सुटतात. पुन्हा पाच वर्षे गायब’ अशी या ग्रामस्थांची व्यथा होती. यातील काही ग्रामस्थांना मोदी हे सध्याचे पंतप्रधान आहेत हे माहित आहे. काही लोकांना या सरकारच्या गॅसच्या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर काहींना घरकुले. पण पाणी, रोजगार हे त्यांचे मूळ प्रश्न कायम आहेत. निवडणुकीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा केले पण तेही परत गेले. अशी या शेतकऱ्यांंची तक्रार होती. मोदींनाच आमच्या समस्या पाहण्यास या गावात आणा. असेही लोकांनी गाºहाणे केले. आवडलेले पंतप्रधान कोण? हा प्रश्न केल्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी ही नावे काही वृद्धांनी घेतली.
सायंकाळी फोफसंडीचा घाट चढून पळसुंदे या दुसºया आदिवासी गावात पोहोचलो. रात्रीचे सात वाजले होते. गावात झेडपीच्या शाळेसमोर एका किराणा दुकानासमोर गप्पा मारत बसलो. तेव्हा एक पिकअप वाहन आले. महिला-पुरुषांनी तुडूंब भरलेले. वाहनात सगळी माणसे उभी होती. कारण त्यांना बसायला जागा नव्हती. चौकशीअंती कळले हे सगळे मजूर देसावर कामाला गेले होते. जे फोफसंडीत तेच येथे. अकोले तालुक्यातील बहुतांश आदिवासी गावांची हीच जीवन कहाणी आहे. या लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनीही तीच व्यथा मांडली. खासदार पाहिला नाही. गावात काम नाही. पाणी नाही. रेशन पुरेसे नाही. या लोकांनाही मोदी माहित आहेत. पण आमच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

रेशनच्या ‘थम्ब’साठी बारा कि.मी.ची पायपीट
शासनाने रेशनसाठी आॅनलाईन थम्ब सक्तीचा केला आहे. त्याचा फटका असा बसला की भीवा वळे दरमहिन्याला समोरचा डोंगर चढून बारा किलोमीटवर बहिरोबावाडीला जातात. तेथे थम्ब देतात. त्याची पावती घेतात. तेव्हा कोठे इकडे गावात येऊन रेशन मिळते. डिजिटल इंडियाने फोफसंडीची अशी अडचण केली.

Web Title: Lok Sabha Election 2019: Ground Report of Lokmat: Rosgarala Desauer; Rational Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.