Lok Sabha Election 2019: प्रचार लोकसभेचा, तयारी विधानसभेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:43 AM2019-03-30T11:43:06+5:302019-03-30T11:45:07+5:30
युती व आघाडीच्या लोकसभा उमेदवारांचा प्रचार केला जात असला तरी त्याआड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी चालविली आहे़
अहमदनगर : युती व आघाडीच्या लोकसभा उमेदवारांचा प्रचार केला जात असला तरी त्याआड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी चालविली आहे़ विधानसभा मतदारसंघनिहाय होत असलेल्या बैठका, मेळाव्याांधून तालुक्यांतील विरोधकांवर टोलेबाजी करीत वातावरण निर्मिती केली जात आहे़ त्यामुळे तालुक्यातील बड्या नेत्यांच्या भाषणांची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे़
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नगर- राहुरी, शेवगाव- पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, पारनेर, आणि नगर शहर, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे़ युती व आघाडीचे उमेदवारही जाहीर झालेले आहेत़ त्यांनी प्रचारही सुरू केला आहे़ प्रचाराला येत्या १० एप्रिलनंतर वेग येणार आहे़ लोकसभेच्या उमेदवारांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आजी-माजी आमदारांसह संभाव्य उमेदवारांवर प्रचाराची जबाबदारी सोपविलेली आहे़ तेही चांगलेच मैदानात उतरले आहेत़ त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमागे चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका हेही एक कारण आहे़ यानिमित्ताने कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना आतापासूनच सक्रिय करण्यावर त्यांचा भर आहे़
नगर शहर विधानसभात सुजय विखे यांच्यासाठी शहर शिवसेना कामाला लागली आहे़ मागील विधानसभा निवडणूकीत ही जागा सेनेने गमावली होती़ यावेळी लोकसभेलाच शहरातून मताधिक्य घेण्याचा सेनेचा प्रयत्न असून, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सेनेचे आजी५माजी नगरसेवक विखे यांच्या प्रचारात सक्रिय झाल आहेत़ नगर- राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत़ राहुरीतील राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे़ शेवगाव- पाथर्डीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आघाडीच्या उमेदवारासाठी ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत़ त्यांच्याविरोधात भाजपच्या आमदार मोनिका राजळे युतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत़
श्रीगोंदा विधानसभा मतदाररसंघाचे माजी आमदार बबनराव पाचपुते युतीच्या, तर विद्यमान आमदार राहुल जगताप आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कामाला लागले आहेत़ कर्जत- जामखेडचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री राम शिंदे
यांनी त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या आहेत़
त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रोहित पवार आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ पारनेरचे विद्यमान आमदार विजय औटी युतीच्या, तर राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार निलेश लंके व सुजित झावरे आघाडीच्या उमेदवाराचे काम करीत आहेत़