Lok Sabha Election 2019 : अहमदनगर तालुक्यात आघाडीत फूट : शिवसेनेच्या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 07:11 PM2019-03-29T19:11:56+5:302019-03-29T19:16:50+5:30
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.
केडगाव : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. असे असतानाच नगर तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली आहे.
नगर तालुक्यातील काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब बाहासाहेब हराळ यांनी युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना जाहीर मेळाव्यात पाठिंबा दिला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर यांनी मेळाव्यास हजेरी लावली. त्यामुळे कॉग्रेस आघाडीत नगर तालुक्यात मोठी फूट पडली आहे.
युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात नगर तालुक्यातील शिवसेना महाआघाडीच्यावतीने शहरातील नक्षत्र लॉन येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. सुजय विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, सभापती रामदास भोर, उपसभापती प्रविण कोकाटे, काँग्रेसचे पंचायत समिति सदस्य रविंद्र भापकर, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गिरवले यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब हराळ म्हणाले, आज डॉ. सुजय विखेंसाठी नगर तालुक्यातील महाआघाडीचा मेळावा आहे. म्हणून मेळाव्याला गर्दी होवू नये म्हणून विरोधकांनी छावणीत ऊसाची वाटप उशीरा केली. मी काँग्रेसचाच माणूस आहे. विखे घराणे हे आमचे दैवत आहे. नगर तालुक्यात शिवसेना- काँग्रेस व इतर मित्र पक्ष यांंची महाआघाडी आहे. ही महाआघाडी फेव्हीकोलचा जोड आहे. ती आत्ताही आणि विधानसभेलाही अशीच कायम राहणार आहे. डॉ. विखेंनी नगर तालुक्यातील जनतेला साकळाई योजनेचे पाणी द्यावे. नगर तालुक्यातील जनता त्यांना कदापि विसरणार नाही.
वॉर्डात पाणी प्रश्न न सोडविणारे ‘साकळाई’ कशी मार्गी लावणार?
डॉ. सुजय विखे यांनी आ. संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. नगर तालुक्यासह दक्षिण भागातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुष्काळाचे प्रश्न आहेत. साकळाई योजनांसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी केंद्रातूनच निधी आणावा लागणार आहे. स्थानिक-बाहेरचा वाद करण्यापेक्षा या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. चार वर्षे आमदार, अनेकवेळा महापौर असतानाही जे स्वतच्या वॉर्डात आजही टँकरने पाणी देतात, वॉडार्तील पाणी प्रश्?न न सोडविणारे ते साकळाई योजना कशी मार्गी लावणार? असा सवाल डॉ. सुजय विखे यांनी केला .