लोकमत इफेक्ट : अखेर उक्कडगावात आला टॅँकर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:35 AM2018-10-12T11:35:47+5:302018-10-12T11:36:32+5:30
‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला.
केडगाव : ‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला. प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेत आजपासून गावात पाणी पुरवठ्यासाठी टॅँकर सुरू केला आहे.
नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. गावाने टॅँकरसाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊनही गावाला टॅँकर मिळाला नाही. सतत २३ दिवस खेटा मारूनही गावाला टॅँकर मिळाला नाही. टॅँकर पुरविणाऱ्या एजन्सीकडे टॅँकर शिल्लक नसल्याने अडचण येत असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. या संदर्भात आज ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि उक्कडगावला टॅँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला. यानंतर सकाळी शासकीय टॅँकर गावात दाखल झाला. आता दररोज टॅँकरने गावाला पाणीपुरवठा होणार आहे.
आजपासून टॅँकरने पाणी पुरवठा सुरू झाला. ‘लोकमत’ने व्यथा मांडल्याने टंचाई शाखेने तत्काळ दखल घेत टॅँकर सुरू केला. त्यामुळे ‘लोकमत’चे आभार. आता दुष्काळ संपेपर्यंत गावाला टॅँकरने पाणी पुरवठा होणार आहे. - नवनाथ म्हस्के, सरपंच, उक्कडगाव