लोकमत इफेक्ट : शहीद जवान म्हस्के यांच्या कन्येला सनराईजने घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:06 PM2018-08-29T15:06:47+5:302018-08-29T15:06:52+5:30
‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारावीपर्यत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
श्रीगोंदा : ‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारावीपर्यत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून आजी - माजी सैनिकांच्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतक-यांच्या प्रत्येकी दहा मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘जय जवान जय किसान’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘लोकमत’मध्ये शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्याविषयी लेख प्रकाशित झाल्यानंतर वीरपत्नी मोहीनी मधुकर म्हस्के यांना सनराईज स्कुलमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर मुलगी अंकिता म्हस्के हीला शिक्षणासाठी दत्तक घेतले. यावेळी ‘जय जवान जय किसान’ या उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. याअंतर्गत आजी- माजी सैनिकांच्या मुलींना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतक-यांच्या १० मुलींना बारावीपर्यत मोफत शिक्षण देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांनी दिली. यावेळी प्रशांत गोरे, सागर बोरुडे, प्रसाद काटे, रामदास वाळके, अविनाश ढेरे, विशाल चव्हाण उपस्थित होते.
लोकमतला धन्यवाद
‘लोकमत’ने जवानांचा पराक्रम आणि त्यांच्या कुंटूबाच्या वास्तव परिस्थितीवर ‘शुरा आम्ही वंदिले’ या विशेषांकातून प्रकाश टाकण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली, त्याबद्दल वीरपत्नी मोहीनी म्हस्के यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.