शहर स्थापनादिनानिमित्त ‘लोकमत’ने केला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:54 AM2019-05-28T11:54:13+5:302019-05-28T13:04:02+5:30
अहमदनगर शहराचा ५२९ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील भिस्तबाग चौक परिसरात जाणीव फौडेंशनच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली.
अहमदनगर : अहमदनगर शहराचा ५२९ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील भिस्तबाग चौक परिसरात जाणीव फौडेंशनच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी महापालिका उपायुक्त सुनील पवार, जाणीव फौंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांच्यासह लोकमतची टीम उपस्थित होती.
आज सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान भिस्तबाग चौक परिसर स्वच्छ करण्यात आला. या परिसरातील कचरा सर्वांनी मिळून हटविला. यावेळी उपायुक्त पवार यांनी ‘लोकमत’ने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका सहकार्य करेल. महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करू शकतात तर प्रसार माध्यमे लोकचळवळ उभी करु शकतात. त्यामुळे ‘लोकमत’ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून हवी असलेली मदत महापालिका प्रशासन करेल, असेही पवार यांनी सांगितले.कैलास दिघे, अॅड.विक्रम वाडेकर, प्रदीप वाघपुरे, विकास जोशी, विकास गायकवाड, महेंद्र नांदुरकर, दीपक भंडारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
लोकमत पुढील १५ दिवस दररोज हे अभियान राबविणार आहे. बुधवार (दि.२९मे) रोजी एकविरा चौक परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी व संघटनांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.