अहमदनगरसाठी २७ तर शिर्डीसाठी २३ फेऱ्यात होणार मतमोजणी; उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 07:30 PM2024-05-31T19:30:51+5:302024-05-31T19:31:31+5:30
मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदारसंघात एकूण १९२ टेबल असणार आहेत
प्रशांत शिंदे
अहमदनगर - अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ४ जूनला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल २७ व्या फेरीला निश्चित होणार आहे तर शिर्डीचा निकाल २३ व्या फेरीला लागणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव-पाथर्डी व पारनेर मतदारसंघासाठी २७ फेऱ्या, कर्जत जामखेड २६, श्रीगोंदा २५, राहुरी २२ तर नगर शहर २१ फेऱ्या होणार आहेत. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २३ फेऱ्या श्रीरामपूर मतदारसंघात होणार आहेत. तर अकोले २२ आणि संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, नेवासा मतदारसंघात प्रत्येकी २० फेऱ्या होणार आहेत.
४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अहमदनगरमधून २५ उमेदवार तर शिर्डीत २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवार संख्या जास्त असल्याने अहमदनगरचा निकाल लागायला उशीर होऊ शकतो. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदारसंघात एकूण १९२ टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल असणार आहेत. यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल, तर ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत. एका टेबलवर ४ कर्मचारी असतील. यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी असणार आहेत.